⁠ 
शनिवार, मे 11, 2024

अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश ; काँग्रेस सोडण्याचं खरं कारणही सांगितलं..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२४ । आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल (दि.१२) पक्षाच्या सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबई नरिमन पॉइंट येथील भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली आहे. मराठवाड्यात खासकरुन नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांची ताकद होती. आता भाजपाला त्या भागात बळ मिळणार आहे. पक्षप्रवेशावेळी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली

प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही करून अशोक चव्हाण यांना पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला. “भाजपामध्ये अशोक चव्हाण यांच स्वागत करतो. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपा, महायुतीची शक्ती वाढलीय. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “देशभरात मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं सुरू केलं. जो बदल देशभरात दिसू लागला आहे. त्यामुळे देशभरातील नेत्यांना आपणही मुख्यप्रवाहात काम करावं, मोदीजींसारख्या नेतृत्वासोबत काम करावं, मोदींचा प्रयत्न आहे, त्यात आपणही वाटा उचलावा असा विचार नेत्यांमध्ये आला. त्यात प्रमुख नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहू शकतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यासाठी खूप विचार केला. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मला कोणीही जा म्हटलं नाही. जिथे होतो तिथे मी शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं आहे. त्यामुळे आज तरी मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही. आम्ही सर्वांनी विकासासाठी एकमेकांना साथ दिली. आज मी माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात हा एक नवा बदल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल करता याची. देशाच्या प्रगतीत आपला वाटा असावा या प्रमाणिक भूमिकेतून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले.