⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जोपर्यंत आदिवासी बांधवाचे स्थलांतर थांबत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही – खा.सुप्रिया सुळे

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । महाराष्ट्रातील समृद्ध, संस्कृतीचा मोठा वारसा असणाऱ्या खान्देशातील शिक्षण,आरोग्य,पाणी, रोजगार, वनसंवर्धन असे अनेक महत्त्वाचे प्रश्न व त्याविषयीच्या इथे असणाऱ्या समस्या वेदनादायी आहेत, मानवी विकास निर्देशांकात हे जिल्हे अति मागासलेले आहेत आदिवासी बहुल व ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने विकास अपेक्षित आहे. परंतु जोपर्यंत या विकास आराखड्याला योग्य दिशा, आर्थिक पाठबळ, आणि कृतीची जोड मिळत नाही, आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर थांबून समाजातील प्रत्येक घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहून सत्तेत असेपर्यंत पुर्णपणे त्याचा पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न करू असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.


शहरातील एस.एस.व्ही.पी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात लोकसंघर्ष मोर्चातर्फे खान्देशस्तरीय विचार संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विचार मंचावर खासदार सुप्रियाताई सुळे,लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे,डॉ.विजया अहिरराव,नंदा मावळे,सुवर्णा भदाणे,उषा पाटील,चैताली अमृतकर आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमात शेतीपूरक, पारंपारिक विविध बियाणांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. आजच्या घडीला शेती हा प्रचंड खर्चिक व भांडवली व्यवसायाचे रुप धारण करणारा विषय झाला आहे. शेती साठी आधुनिक उपकरणे,अनुकूल वातावरणाबरोबरच अन्नधन्य पिकण्यासाठी बीज बियाणांचे संवर्धन होणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी शेतीची पध्दत अधिक समृद्ध व्हावी म्हणून पारंपरिकरित्या जतन केलेली बियाणे प्रदर्शनात मांडण्यात आली होती.


कार्यक्रमाचे उद्घाटन शेतीचे प्रतिक असलेल्या नांगराची पुजा आणि सृजनशीलतेचे प्रतीक असलेल्या रोपाला पाणी घालून करण्यात आले. महाराष्ट्राच्या विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी, आणि उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाची स्वतंत्र स्थापना करून विकास साधण्यासाठी, आदिवासी, कष्टकऱ्यांच्या न्याय व हक्कांंसाठी लढणारी लोकसंघर्ष मोर्चा ही संघटना सतत संघर्ष करत आली आहे.


प्रास्ताविकात सत्य,अहिंसेचा संदेश संपूर्ण जगाला देणारे गौतम बुद्ध,रयतेच राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज,शाहू,फुले,बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचा वारसा लाभलेल्या आपल्या देशाचा विकास करताना केंद्रबिंदू असणारे गोरगरीब मजूर, महिला यांना मुख्य प्रवाहात आणून आपल्या संस्कृती व परंपरेची जतन करणारा माणूस ही महत्त्वाचा आहे.साने गुरुजी,बहिणाबाई यांचा विचारांचा समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या खान्देशचा विकास होणे महत्वाचे आहे असे मत लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे यांनी व्यक्त केले.


यंग फाऊंडेशनचे संदीप देवरे, वृषभ अहिरे यांनी क्रांतीगिते सादर केली. कार्यक्रमाचे सुंत्रसंचालन जागृती बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय महाजन,सचिन धांडे,नितीन माने,आसिफ पटेल,भैय्या पाटील, प्रकाश बाविस्कर, प्रकाश पाटील, सचिन पाटील, पल्लवी पाटील, शिवानी मराठे, रोहित येवले,चेतन उपाध्याय, विशाल वानखेडे, मनिष पाटील,किर्तीवर्धन पानपाटील, ईश्वर वाघ, गौतम बोराळे यांनी परिश्रम घेतले.