जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का; ‘हा’ नेता अजित पवार गटात प्रवेश करणार

नोव्हेंबर 11, 2025 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२५ । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.

sharad pawar jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण गुजराथी यांचा आज मंगळवारी अजित पवार गटात मुंबईत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवार गटाकडून कंबर कसली असताना त्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील तसेच माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे आणि अरुण पाटील यांचा समावेश आहे. अशातच आता विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी होती.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही जाणाऱ्यांना जाऊ द्या, असे म्हणत त्यावेळच्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला होता. मात्र, त्यावेळी खुद्द गुजराथी यांनी स्पष्ट केले होते की, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मला आजवर भरपूर दिले आहे. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. आता मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात असले तरी, मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार आहे.त्याच गुजराथी यांनी आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now