जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या संपूर्ण राज्यात भीषण उष्णतेसोबतच इंधन टंचाई आणि दरवाढीचा वणवा पेटलेला आहे. दरम्यान, शेती कामांना वेग आला असल्याने बळीराजा डिझेलसाठी वणवण भटकत आहे. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत धरणगाव-चोपडा रस्त्यावरील एका पेट्रोल पंप चालकांकडून बुधवारी रात्री माणुसकीचे दर्शन दिसून आले. दुपारी दोन वाजेपासून डिझेलसाठी रांगेत उपाशीपोटी ताटकळत उभ्या असलेल्या सुमारे २५० हून अधिक शेतकऱ्यांची भूक ओळखून पंप चालकाने थेट पंपाच्या आवारातच कढी-खिचडीचा बेत आखून भोजनाची व्यवस्था केली.

सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेती कामांना वेग आला आहे, त्यामुळे डिझेलची मागणी प्रचंड वाढली आहे. इंधन टंचाईमुळे तालुक्यातील पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बुधवार, २० मे रोजी धरणगाव येथील ‘पवार पेट्रोलियम’वर दुपारी २ वाजेपासूनच परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी डिझेलसाठी गर्दी केली होती.

दरम्यान, पंपावरील डिझेल संपल्याने सर्वजण नव्या टँकरची प्रतीक्षा करत होते. मात्र, हा टँकर रात्री १० वाजेच्या सुमारास येणार असल्याची माहिती मिळताच, दुपारपासून उपाशी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि निराशेचे वातावरण पसरले.
पंपाच्या आवारातच बसली पंगत
शेतकऱ्यांची ही गैरसोय आणि भूक लक्षात घेऊन पवार पेट्रोलियमचे संचालक चंदन दिलीप पाटील यांनी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला. रात्री उशिरापर्यंत थांबणाऱ्या बळीराजाला उपाशी राहावे लागू नये, म्हणून त्यांनी तातडीने पंपाच्या आवारातच रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली. सर्व २५० हून अधिक शेतकऱ्यांना पंपाच्या आवारात पंगती बसवून गरम गरम कढी आणि खिचडी आग्रहाने जेऊ घातली.
…आणि बळीराजा तृप्त होऊन घरी परतला!
ऐन संकटाच्या आणि गरजेच्या वेळी डिझेल उपलब्ध करून देण्यासोबतच, आपल्या भुकेची काळजी घेणाऱ्या चंदन पाटील यांच्या या सामाजिक जाणिवेचे आणि औदार्याचे शेतकऱ्यांनी मनापासून आभार मानले. रात्री १० वाजेच्या सुमारास डिझेलचा टँकर पंपावर दाखल झाला. त्यानंतर व्यवस्थापनाकडून सर्व शेतकऱ्यांना रीतसर आणि शांततेत डिझेलचे वाटप करण्यात आले.
व्यापारात केवळ नफा न पाहता शेतकऱ्यांप्रती अशी कौतुकास्पद माणुसकी दाखवल्याबद्दल सध्या संपूर्ण धरणगाव तालुक्यात पवार पेट्रोलियम आणि चंदन पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.











