⁠ 

नागरिकांनो काळजी घ्या! लवकरच धडकणार उष्णतेची लाट! IMD कडून एप्रिल महिन्यातील अंदाज जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२३ । राज्यात मागील काही दिवसापासून कधी ऊन तर कधी पाऊस असा खेळ सुरु आहे. या बदलत्या हवामानामुळे डोखेदुखी वाढली आहे. त्यातच यंदाचा उन्हाळा डोक्याला ताप देणारा ठरु शकतो. एप्रिल महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान खात्याकडून एप्रिल महिन्यातील हवामानाचे अंदाज जाहीर करण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, दिल्लीसह आग्नेय भारतामध्ये एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उष्णतेचे प्रमाण सामान्य राहील. मात्र, पूर्वेकडचा भाग, मध्य भारत आणि महाराष्ट्र व गुजरातच्या पश्चिमेकडील किनारपट्टीच्या भागात एप्रिल महिन्यात तापमान हे सामान्य पातळीपेक्षा अधिक राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

याशिवाय, सर्वसाधारपणे एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या काळात देशातील जवळपास सर्व भागांमध्ये तापमानाचा पारा नेहमीपेक्षा जास्त राहील. एप्रिलच्या मध्यापासून सर्व राज्यांमधील तापमान वाढण्यासा सुरुवात होईल. हाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, गुजरात आणि हरयाणाच्या काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. केवळ दक्षिणेकडील किनारपट्टीचा काही भाग आणि ईशान्य भारतातील काही भाग याला अपवाद असतील. या भागांमध्ये तापमान सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी राहील, असे भाकीत हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. यामुळे एप्रिलमध्ये 6 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचाही अंदाज आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.