जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज (VJNT), इमाव (OBC) आणि विमाप्र (SBC) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेचे स्वरूप आणि जागा
या योजनेंतर्गत दरवर्षी एकूण ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने पदव्युत्तर पदवी (Master’s) आणि पीएचडी (Ph.D.) अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ज्या परदेशी शैक्षणिक संस्थांचे QS रँकिंग २०० च्या आत आहे, अशाच नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे लाभ दिले जातात.

शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय व अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध असून पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शिष्यवृत्तीचे स्वरूप, पात्रता अटी व अर्जाचा नमुना याबाबतची सविस्तर माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. परदेशी शिष्यवृती अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचा अन्य महत्वाच्या अटी शर्ती इ. सविस्तर माहीतीसाठी विभागाच्या https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in व https://www.dirobbwd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
इच्छुक विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. तसेच अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह स्वहस्ताक्षरीत प्रती २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे येथे सादर कराव्यात. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी विशाल पी. राठोड यांनी केले आहे.







