फळबाग, फुलशेती लागवड अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । महात्मा गांधी राष्ट्रीय गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतामध्ये सलग लागवड, बांधावर लागवड, पडीक जामिनीवर लागवड, रोहयो अंतर्गत फळबाग व इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना 3 वर्षात 100 टक्के अनुदान आहे, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजना २००८ नुसार अल्प भूधारक व सिमांत शेतकरी, अनु. जमातीचे व अन्य् परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती या पैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करणारा लाभार्थी 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत या योजनेतील लाभार्थी होऊ शकतात
योजनेअंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरु,डाळींब, सिताफळ, संत्रा, मोसंवी, लिंबू, नारळ, बोर, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, केळी, ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडा, द्राक्ष इत्यादी फळपीके तसेच बांबू, साग, करंज, गिरीपुष्प, शेवगा, अंजन, खैर, ताड, निलगिरी, तुती, रबर, नीम, महोगुणी, शिसव, महुआ, चिनार, शिरीष, करवंद, गुलमोहर, इत्यादी वृक्षांची तसेच मसाला पिके जसे लवंग, मिरी, जायफळ, दालचिनी व औषधी वनस्पती (अर्जुन, आइन, असन, अशोक, बेल, गुग्गुळ, लोध्रा, शिवन, रक्तचंदन, टेटू, बेहडा, बिब्बा, डिकेमाली, हिरडा, रिठा, वावडींग, करंज, पानपिंपरी) वृक्षांची लागवड करता येते.
फुलपिके लागवड
सन 202-21 पासुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर फुलपिके लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतावर निशिगंध मोगरा, गुलाब, सोनचाफा या फुलपिकाची लागवड करता येईल. फुलपिकांच्या बाबत लाभार्थ्यांना एकाच वर्षात 100% अनुदान देय राहील.
संपूर्ण लागवड कार्यक्रमासाठी पुर्व हंगाम मशागत करणे, खड्डे खोदणे, झाडांची लागवड करणे, पाणी देणे, किटकनाशके, औषधे फवारणी व झाडाचे संरक्षण करणे इ. कामे लाभधारकाने स्वत: नरेगा अंतर्गत तयार श्रमिक गटद्वारे व जॉब कार्डधारक मंजुरांकडून करुन घ्यावयाची आहे. तसेच 7/12 उताऱ्यावर लागवड केलेल्या फुलपिकांची नोंद घेणे लाभार्थ्यांवर बंधनकारक राहील. सर्व फळपिके व फुलपिके लागवडीचा कालावधी 1 जून ते31 डिसेंबरपर्यंत राहील. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. फळपिकाची लागवड करुन या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक यांनी केले आहे.