नशिराबादच्या API योगीता नारखेडेंना ‘लोकमत खानदेश रत्न’ पुरस्कार जाहीर

मार्च 16, 2026 12:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नशिराबाद पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगीता मधुकर नारखेडे यांना मानाचा ‘लोकमत खानदेश रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्या हातांनी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, त्याच हातांनी तब्बल ७९ अपहृत मुलींची सुटका करत त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाशाची वात पेटवली. त्यांच्या या अफाट कार्याला हा एक मानाचा मुजरा आहे.

yogita narkhede 2

​शून्यातून विश्व निर्मितीचा प्रवास: लहानपणीच पाहिलेलं स्वप्न
१० डिसेंबर १९८८ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या योगीता नारखेडे यांना लहानपणापासूनच घरातून शिस्त आणि राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळाले. बी.ए. (अर्थशास्त्र) या विषयात सुवर्णपदक मिळवल्यानंतर त्यांनी थेट पोलीस दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले. सन २०१२ मध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी (MPA) नाशिक येथे पीएसआय (PSI) म्हणून त्यांचे खडतर प्रशिक्षण पार पडले आणि एका खऱ्या रणरागिणीचा जन्म झाला.

​नाशिक ते मुंबई: ‘डिटेक्शन’चा दबदबा आणि ‘राज कुंद्रा’ प्रकरण
२०१३ मध्ये पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. २०१३ ते २०१९ या काळात नाशिक शहर पोलीस दलात ‘डिटेक्शन इन्चार्ज’ म्हणून त्यांनी आपला वेगळाच दबदबा निर्माण केला. घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहन चोरी अशा गुन्ह्यांचा तांत्रिक तपासाचे जाळे विणून छडा लावला. २०१९ मध्ये मुंबईसारख्या महानगराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. २०१९ ते २०२१ या काळात API पदावर कार्यरत असताना गाजलेल्या ‘राज कुंद्रा’ प्रकरणाच्या गुंतागुंतीच्या तपासात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मोठ्या धाडी टाकणे, अवैध धंदे उद्ध्वस्त करणे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्हेगारांना न्यायालयात खेचण्यात त्यांचा हातखंडा राहिला आहे.

​जळगावमधील ‘मिशन मुस्कान’: तब्बल ७९ लेकींची सुटका!
२०२१ मध्ये जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात’ (AHTU) त्यांची नियुक्ती झाली आणि येथून त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक संवेदनशील पर्वाला सुरुवात झाली. भारतीय दंड विधान कलम ३६३ नुसार अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र, रात्रंदिवस एक करून, देशाच्या कानाकोपऱ्यात छापे मारून त्यांनी तब्बल ७९ अपहृत मुलींची मानवी तस्करांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. मुलींना पुन्हा आईच्या कुशीत सोपवताना पालकांच्या डोळ्यातील दिसणारे समाधान हेच त्यांच्यासाठी खरे ‘रत्न’ ठरले. याशिवाय ‘पिटा’ कायद्यांतर्गत कारवाई करत १४ पीडित महिलांची देहविक्रयाच्या दलदलीतून सुटका करत त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले.

​प्रशासकीय कौशल्य आणि कर्तव्याचा ‘शतकोत्सव’
२०२३ मध्ये कासोदा पोलीस स्टेशनच्या ‘प्रभारी अधिकारी’ म्हणून काम पाहताना त्यांनी ग्रामीण भागातही प्रशासनाला एक नवी दिशा दिली. गुन्हेगारांवर वचक आणि जनतेशी जिव्हाळा असे त्यांचे धोरण राहिले. सध्या त्या नशिराबाद पोलीस स्टेशन येथे प्रभारी म्हणून चोख कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या १०-१२ वर्षांच्या धडाडीच्या सेवेची पावती म्हणजेच त्यांना मिळालेली तब्बल १०६ रोख पारितोषिके आणि ३२ प्रशंसापत्रे होत. ​सपोनि योगीता नारखेडे यांनी केवळ खाकी वर्दीची शान वाढवली नाही, तर समाजाचा महिला अधिकाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. गुन्हेगारांसाठी ‘कर्दनकाळ’ आणि गरिबांसाठी ‘आधार’ असलेल्या या खानदेशच्या रणरागिणीला मिळालेला ‘खानदेश रत्न’ पुरस्कार हा त्यांच्या अखंड संघर्षाचा आणि यशाचा सर्वोच्च सन्मान आहे!

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now