जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात पुन्हा गिलियन बरै सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर जीएमसीत उपचार सुरू आहे. २२ वर्षीय तरुणाला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अशक्तपणा, अंगदुखी, पायाला मुंग्या येणे, चालता न येणे यासारखी लक्षणे जाणवत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याचे सर्व अहवाल ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झाले.

रावेर तालुक्यातील हा २२ वर्षीय तरुण महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे गेला होता. तेथून परत आल्यावर प्रकृती ठीक नसल्याने त्याने बऱ्हाणपूरला खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तेथे जीबीएससदृश लक्षणे जाणवल्याने डॉक्टरांनी त्यास न्यूरोलॉजिस्ट किंवा मुंबई येथे उपचार घेण्याचा सल्ला दिला. याची माहिती प्रशासनाला समजल्यानंतर रुग्णाला मंगळवारी जीएमसीत दाखल करण्यात आले.
बुधवारी या रुग्णाच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्याच्या जीवितास कोणताही धोका नाही असेही डॉक्टरांनी सांगितले. यापूर्वी डिसेंबर महिन्यात जळगाव शहरात पुरुष रुग्ण आढळून आला होता तर जानेवारी महिन्यात ४० वर्षीय महिला जीबीएस आजाराची आढळून आली होती. दरम्यान, काही लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करावी; मात्र कोणीही घाबरू नये.