जळगाव जिल्ह्यातील आणखी एक अधिकारी लाच घेताना अडकला

मे 13, 2026 11:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकतेच ५ लाखाची लाच घेताना PWD शाखा अभियंत्याला अटक केल्याची घटना ताजी असताना अशातच जिल्ह्यात आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. अवैध उत्खननाच्या तक्रारीची चौकशी बंद करण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नशिराबादचा मंडळ अधिकारी व त्याचा खाजगी पंटरला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली.

lach

तक्रारदार हे त्यांच्या शेतात अवैध खोदकाम करत असल्याची तक्रार काही स्थानिक रहिवाशांनी तहसील कार्यालयात केली होती. या अर्जाची चौकशी मंडळ अधिकारी मिलिंद प्रकाश देवरे याच्याकडे होती. ही चौकशी बंद करून तक्रारदाराला मदत करण्याच्या बदल्यात देवरे याने थेट १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट नाशिक येथील एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

नाशिक एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपींनी तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.लाचखोर देवरे याच्याकडे जळगावच्या पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. नाशिक एसीबीचे पथक गेल्या तीन दिवसांपासून जळगावातील अजिंठा विश्रामगृहात ठाण मांडून होते. मंगळवारी देवरे याच्या सांगण्यावरून त्याचा खाजगी पंटर सुरेंद्र अहिरे याने पिंप्राळा तलाठी कार्यालयासमोर लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी आधीच सापळा रचून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना झडप घालून रंगेहाथ ताब्यात घेतले.

याप्रकरणी जळगाव येथील रामानंद नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, लाचखोर मंडळ अधिकारी देवरे याला शासनाचा तब्बल ५५ हजार रुपये महिना पगार असतानाही त्याने लाचखोरीचा मार्ग निवडला.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात धुळे, नंदुरबार व नाशिक एसीबी पथकाने सापळे रचून कारवाया केल्या आहेत. जळगाव विभागाकडून अनेक कारवाया फेल होत असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदारांनी आपला मोर्चा जिल्हाबाहेरील यंत्रणेकडे वळवला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now