जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । जळगाव फेरी पूर्ण करून अमळनेर आगारात परतलेल्या बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना मंगळवार दि.७ रोजी घडली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आणखी एका चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना गुरवार दि.९ रोजी घडली असून या घटनांमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अमळनेर आगारात गुरुवार दि.९ रोजी आणखी एका चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. दीपक हिरामण पाटील असे हृदयविकाराचा झटका आलेल्या बसचालकाचे नाव आहे. चालक दीपक पाटील आणि वाहक व्ही.आर.चौधरी यांना आगाराच्या वरीष्ठांनी पारोळा येथे बस घेऊन जाण्याचे निर्देश दिले होते. मात्र दुपारी अचानक चालक दीपक पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉ.जी.एम. पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अमळनेर आगाराचे वाहतूक निरीक्षक आर.एस.पाटील उपस्थित होते.
तीन दिवसात दुसरी घटना
अमळनेर आगारात गेल्या तीन दिवसात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मंगळवार दि.७ रोजी चालक प्रवीण पाटील हे जळगाव फेरी पूर्ण करून आल्यानंतर कॅबिनकडे जात असताना ते कॅबिनच्या प्रवेशद्वारात कोसळले होते. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच गुरुवारी आणखी एका चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.