“शावैम” मध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मिळाला दुसरा मृतदेह
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । देहदानाची इच्छा व्यक्त केलेल्या सेवानिवृत्त प्राचार्य विनायक पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा देह येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये शरीररचनाशास्त्र विभागामध्ये मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नातेवाईकांनी ताब्यात दिला. महाविद्यालय स्थापनेनंतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मिळालेला हा दुसरा मृतदेह आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी देहाचा अभ्यास करण्यासाठी मृतदेहाची आवश्यकता असते. त्यासाठी देहदान करणाऱ्या व्यक्तींची नितांत आवश्यकता असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ११ मे २०१७ रोजी सुरू झाले. त्यानंतर २२ ऑक्टोंबर २०२० रोजी किरण घेवरचंद राका या ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मिळाला होता. त्यानंतर दीड वर्षांनी आता दुसरा मृतदेह मिळाला आहे.
जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयचे सेवानिवृत्त प्राचार्य विनायक त्र्यंबक पाटील (वय ८१) यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी केलेल्या देहदानाच्या संकल्पनुसार त्यांचा मृतदेह नातेवाइकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. या ठिकाणी शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अरुण कसोटे, प्रा. लोंढे यांनी मृतदेह स्वीकारून पुढील कार्यवाही केली.
मृतदेहाला शवगारातील फ्रीजमध्ये ठेवून त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. याद्वारे मृतदेह संरक्षित करण्यात आला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना मानवी शरीराच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी मृतदेहाचा उपयोग होणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. तसेच देहदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, शरीररचनाशास्त्र विभागात संपर्क करावा तसेच देहदानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे प्रयत्न केले जातील अशीही माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिली.
हे देखील वाचा :