जिल्ह्यात शिवसेनेला अजून एक धक्का : आ. गुलाबराव पाटील समर्थकांचा राजीनामा
जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । जिल्ह्यात शिवसेनेला अजून एक धक्का बसला असून आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांचे राजीनामा देणे अजूनही सुरूच आहे. आज उपजिल्हा प्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील आणि शहराध्यक्ष राजेंद्र महाजन यांनी आपापल्या पदांचे राजीनामे शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सुपुर्द केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांना राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी देखील समर्थन दिले आहे. धरणगावात शिवसेनेचा मेळावा देखील घेण्यात आला होता. तेव्हाच गुलाबराव पाटील समर्थकांनी याकडे पाठ फिरवली होती. तर मध्यंतरी मतदारसंघातील सर्व महत्वाच्या पदाधिकार्यांनी आ. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांची सोबत कायम राखणार असल्याची ग्वाही दिली होती.
या अनुषंगाने आज शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील आणि शहराध्यक्ष राजेंद्र महाजन यांनी आपापल्या पदांचे राजीनामे शिवसेनाच जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. या पाठोपाठ आता जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकारी आपापल्या पदांचे राजीनामे देऊन आ. गुलाबराव पाटील यांच्या सोबत जाणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.