जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२४ । खरीप हंगाम सन २०२३ – २४ महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात आला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव चाळीसगाव तालुक्याचा समावेश झाला असल्याने दुष्काळी तालुक्यांसाठी असणाऱ्या विविध सोयी सवलती चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लागू झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई खात्यात जमा झाली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. राज्य शासनाने या ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी मदतीचा शासन निर्णय प्रसिध्द केला आहे.

त्यात चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार ४७८ शेतकऱ्यांना जवळपास १३३ कोटी १९ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. महिन्याभराच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.







