अजितदादाचं धक्कातंत्र; अनिल पाटलांचा मंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट?
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२४ । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज नागपूर इथे होत असून थोड्या वेळातच शपथविधी सोहळा सुरु होणार आहे. यावेळी भाजपचे २०, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महायुतीच्या मंत्र्यांमध्ये अनेक विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून अजित पवारही विद्यमान पाच मंत्र्यांना डच्चू देणार असून त्यांच्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांचा मंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट झाला आहे. अद्यापही मंत्रिपदासाठी त्यांना फोन आला नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही धक्कादायक नावे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे.
गेल्या मंत्रिमंडळात अनिल पाटील हे अडीच वर्ष मंत्री राहिले. राष्ट्रवादीकडून अनिल पाटीलांसह, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा आत्राम, आणि संजय बनसोडे यांचा देखील पत्ता मंत्रिमंडळातून कट करण्यात आल्याची चर्चा आहे.
मागील निवडणुकीप्रमाणे या वेळीही अजित पवार सोडून राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती आहे. यामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, दत्तात्रेय भरणे, इंद्रनील नाईक याशिवाय सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.