जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी ताईंची दिवाळी होणार गोड; खात्यात जमा होणार २ हजार रुपये

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीचा सण जवळ आला असताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य आणि पोषण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या महिलांना शासनाकडून दिवाळीनिमित्त प्रत्येकी २ हजार रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम दिवाळीपूर्वीच थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ८८८ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

थेट बँक खात्यात जमा होणार भाऊबीज

यापूर्वी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भाऊबीजेच्या निधीचे वाटप जिल्हास्तरावरून केले जात होते. मात्र, यंदा वितरण प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास आयुक्तालयामार्फत ही रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी याकरिता शासनाकडून साधारण दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ७ हजार ८८८ महिलांना लाभ

जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ हजार ४४५ अंगणवाड्या असून, तेवढ्याच सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. तर शहरी भागात ५०९ अंगणवाडी सेविका आणि ५०९ मदतनीस आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील या सर्व महिला कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ७ हजार ८८८ आहे. या सर्वांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट मिळणार आहे.

गरोदर माता, स्तनदा माता आणि नवजात बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचवण्यापासून ते कुपोषण निर्मूलनापर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. स्थलांतरित मजुरांच्या मुलांची काळजी घेणे, बालकांचे आरोग्य आणि पोषणविषयक देखरेख करणे, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, अशी अनेक कामे त्या करतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेत दिवाळीनिमित्त देण्यात येणारी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित करणारी ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button