⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आनंददायी : थाटामाटात पार पडला दिव्यांगांचा विवाह सोहळा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । आर्थिक दृष्ट्या उपेक्षित आणि शारीरिक अपंगत्व वाट्याला आलेल्यांना जीवनसाथी मिळवून देण्याचा अभिनव उपक्रम चाळीसगाव येथील उद्योजक, व्यापारी वर्धमान धाडिवाल यांनी सार्थ करून दाखवला आहे. चाळीसगाव येथील धुळे रोड लगत असलेल्या बालाजी लॉन्समध्ये २७ मार्चला मोठ्या थाटात या दोघा अपंग बांधवांचा विवाह सोहळा पार पडला.

शहरातील स्वयंदीप संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षी निकम यांच्या संकल्पनेतून आणि वर्धमान धाडिवाल मित्र परिवाराच्या योगदानाने पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील बाबूलाल लोटन परदेशी यांची दिव्यांग कन्या लोचना (सरला) व सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथील स्वर्गीय सुरेश त्र्यंबक खैरनार यांचे चिरंजीव भूषण यांचा विवाह नुकताच बालाजी लॉन्समध्ये थाटात झाला. वर्धमान धाडिवाल यांनी कोरोना काळात व्यावसायिक दृष्टी बाजूला ठेवत रुग्णांची सेवा करणे हाच धर्म त्यांनी मानला. रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, बेड उपलब्ध करून देणे, इंजेक्शन उपलब्ध करून देणे, एवढेच नव्हे तर रुग्णासाेबत असणाऱ्या व्यक्तीला दररोज सकाळी, सायंकाळचा डबा पुरवण्याचे काम वर्धमान धाडिवाल यांनी केले. अपंग भगिनी सरला हिचा विवाह ही त्यांनी स्वखर्चाने लावून दिला आहे.

असा जुळून आला योग
स्वयंदीप संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम व वर्धमान धाडिवाल यांनी दिव्यांग बांधवांचा वधू-वर मेळावा घेण्याचे ठरवले. मात्र, कोरोनामुळे तो रद्द केला. त्यानंतर दिव्यांगांचा व्हाॅट्सऍप ग्रुप तयार केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा योग जुळून आल्याचे वर्धमान धाडिवाल यांनी सांगितले. या विवाहासाठी वर्धमान धाडिवाल यांचे व्याही राजेंद्र कर्नावट हे सपत्नीक सहपरिवार पुणे येथून आले होते. त्यांनी सरलाचे कन्यादान केले. या विवाहाची संकल्पना स्वयंदीप संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम यांनी मांडली होती. समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विवाहास हजेरी लावून कौतुक केले.

स्वयंदीप संस्थेतर्फे आतापर्यंत चार विवाह
स्वयंदीप संस्थेने आतापर्यंत चार दिव्यांग बंधू- भगिनींचे विवाह लावले असून हा पाचवा विवाह होता. ज्यांचे विवाह झाले ते आज गुण्यागोविंदाने संसार करत असल्याचे या वेळी सांगण्यात अाले. तसेच निराधार मुली, महिलांना ही त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ स्वयंदीप संस्थेने प्राप्त करून दिले आहे.

थाटात विवाह गौरवास्पद : मीनाक्षी निकम
मीनाक्षी निकम म्हणाल्या की, दिव्यांग भगिनीचा सामाजिक कार्यकर्त्या मार्फत असा विवाह होणे, ही गौरवाची बाब आहे. समाजात असे लोक पुढे आल्यास अनेक दिव्यांगांना मिळेल आधार. वर्धमान धाडिवाल मित्र परिवाराने हा विवाह आयोजित केला तरी कन्यादान कर्णावट परिवाराने केले.