धावत्या रेल्वेत अविवाहित तरुणीने दिला बाळाला जन्म, शौचालयात बाळाला फेकले अन्..

सतर्क प्रवाशामुळे घटना उघडकीस : मातेविरुद्ध गुन्हा, दोघांना जिल्हा रुग्णालयात केले दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । महानगरीच्या बोगी क्रमांक एस-3 मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या शौचालयात अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकाला सोडून मातेने पलायन केल्याची घटना मंगळवार दि.१ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता घडली होती. हा प्रकार सुज्ञ प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस निरीक्षक विजय घेर्डे व सहकार्‍यांनी भुसावळ-पाचोरा दरम्यान गाडीची कसून तपासणी करीत मातेचा शोध लावला. नवजात अर्भकासह मातेला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अप महानगरी एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 3 मधून 19 वर्षीय अविवाहित माता असलेली तरुणी व तिची आजी खंडवा ते मुंबई प्रवास करीत असताना तरुणीला प्रसव कळा सुरू झाल्या व तिने धावत्या रेल्वेतच पुरूष जातीच्या अर्भकाला जन्म दिला मात्र बाळ अनैतिक संबंधातून जन्मल्याने त्याची वाच्यता टाळण्यासाठी तरुणी असलेल्या मातेने बाळ शौचालयात टाकले व सीटवरून जावून बसली मात्र हा प्रकार एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना कळवला.

भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर नवजात अर्भकाचा ताबा घेण्यात आला व त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले मात्र माता आढळत नसल्याने भुसावळसह जळगाव येथून लोहमार्ग पोलिसांनी गाडीत मातेचा शोध सुरू केला. एका सीटखाली अविवाहित तरुणी संशयास्पद अवस्थेत दिसल्याने तिला विचारपूस केल्यानंतर तिने बाळाला जन्म दिल्याची व अनैतिक संबंधातून प्रसुती झाल्याची कबुली दिल्यानंतर पाचोरा येथे पहाटे गाडी थांबवून मातेला जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत याप्रकरणी मातेविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात नवजात अर्भक बेवारसरीत्या टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मातेसह अर्भकाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय घेर्डे व सहकारी करीत आहेत.