कोचुरच्या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत फुलविली सफरचंद बाग
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२४ । झाडावर लगडलेली हिरवी, लाल आणि केशरी सफरचंद म्हटली की आपल्याला हिमाचल प्रदेश आठवतो. परंतु रावेर तालुक्यातील कोचूर येथील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत सफरचंद या पिकाची लागवड केली आहे. या प्रयोगात या शेतकऱ्याला यश देखील संपादन झाले आहे.
कोचूर परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होते; परंतु पारंपरिक केळी पिकाला पर्याय म्हणून येथील प्रगतिशील शेतकरी उज्ज्वल पाटील व त्यांचा मुलगा पीयूष उज्ज्वल पाटील व प्रणव संदीप पाटील यांनी सफरचंदाची लागवड केली आहे.
केळी या भागातील मुख्य पीक आहे; मात्र काही दिवसांपासून कधी अस्मानी संकट, तर कधी केळीला भावच नाही. केळी पिकाला लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. केळीला समाधानकारक असा भाव मिळत नसल्याने या शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग म्हणून हिमाचल प्रदेशातून सफरचंद पिकाची रोपे आणून लागवड केली. आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान असते; परंत तापमानात देखील सफरचंदाची बाग फुलून दाखवली. त्यामुळे या परिसरात त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक शेतकरी करीत आहेत.
सफरचंदाच्या या बागेमध्ये या शेतकऱ्याने आंतरपीक म्हणून टरबूज कांदा यांचीदेखील लागवड करून त्याचे उत्पन्न घेतले आहे. सफरचंदचा प्रयोग या परिसरात यशस्वी ठरू पाहत आहे.