सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग-3
इतिहास साक्षीदार आहे, कि जिथे एकीकडे आपल्या देशात राष्ट्राला समर्पित असलेले संत-महात्मे, वीरव्रत सेनानायक, देशभक्त, सुधारवादी महापुरुष तसेच कुशल राज्यनेते जन्माला आले, तिथेच दुसरीकडे देशहिताला नकार देत, केवळ आपल्या स्वार्थाच्या पूर्ततेसाठी शत्रूंना साथ देणाऱ्या देशद्रोहींची आणि फितुरांचीही कमी नाही. या फितुरांमुळे एकेकाळीं विश्वगुरू असलेला आपला देश; कित्येक वर्षांपर्यंत पारतंत्र्याचा दंश झेलत राहिला.
इ.स. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामातही याच इतिहासाची पुनरावृती झाली. संपूर्ण देशाने एकत्र येऊन इंग्रजांची सत्तापालट करणारा जो अतुलनीय संग्राम लढला, त्यात काही सत्तापिपासूंनी, घराणेशाही राजांनी आणि मोहामध्ये अडकलेल्या धन-कुबेरांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. संघर्ष करणाऱ्या देशाच्या वीर सैनिकांचा तिरस्कर करून विदेशी व विधर्मी प्रशासनाची साथ देणाऱ्या या नीच फितुरांमुळेच आपण ‘स्वधर्म आणि स्वराज्य’ यांकरिता महासंग्रामात जिंकूनही पराभूत झालो.
परिणाम स्वरूपात; इंग्रज शासकांनी दडपशाहीचा आधार घेत, आपल्या सैनिकांना फासावर चढविण्यास सुरूवात केली. ज्या गावातून, कसब्यातून किंवा नगरातून एक जरी स्वातंत्र्यसैनिक पुढे आला, तरी त्याला मुळापासून संपविण्यात येत होते. स्वातंत्र्यसैनिकांना थोडीफार मदत करणाऱ्यांना बेकायदेशीर सूची बनवून गोळ्या घालण्यात आल्या. या प्रकारे देशभक्तांची घरे, संपत्ती आणि जमीन इत्यादी घटकांना आपल्या ताब्यात घेऊन सरकारी दलालांकडे सोपविण्यात आले. सरकारने एक नवीन कायदा ‘आर्म्स ॲक्ट’ आणून संपूर्ण भारतवासियांना शस्त्रविरहित करण्याचे षड्यंत्र रचले. एवढं होऊनही इंग्रजभक्त भारतीयांनी आपल्या पारतंत्र्यपूर्ण मानसिकतेला तिलांजली दिली नाही. देशभक्त आणि देशद्रोहींमध्ये प्रतिस्पर्धात्मक स्वरूपात असलेला हा आपला गेल्या एक हजार वर्षांचा इतिहास आहे.
हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे, कि वीर प्रसूता भारत माता; सैन्याची व आध्यात्मिक शूर-वीरांची जननी आहे. १८५७च्या महासंग्रामानंतर काही वर्षांपर्यंत देशात शांतता होती, मात्र केवळ एक दशक उलटताच भारतीयांच्या मनात शिरलेली वीरव्रत तळपती अग्निज्योत पुन्हा त्याच ताकदीने प्रज्वलित झाली. ब्रिटीशांच्या दडपशाहीच्या विरोधात प्रचंड प्रमाणात आवाज उठविण्यात आला आणि ‘स्वतंत्र भारतीय प्रजासत्तेच्या’ स्थापनेमागील उद्देशाने, महाराष्ट्राच्या धरतीवर उत्पन्न झालेल्या वासुदेव बळवंत फडके या महान क्रांतिकारकाने सशस्त्र क्रांतीचे रणशिंग फुंकले.
महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीधर या गावात जन्मलेला वासुदेव; बालपणापासूनच निडर व निर्भीड वृत्तीचा होता. आई वडिलांची इच्छा होती, कि आपल्या मुलाने कुठलीही सामान्य नोकरी करावी; मात्र विधात्याने तर या तरुणाकडून एखादे मोठे काम करून घेण्याचे ठरवले होते. खूप विचार-विमर्श करून वासुदेवाने घर सोडले आणि मुंबईत येऊन रेल्वे विभागात नोकरी करण्यास सुरूवात केली. याच काळात मुंबईमधील न्यायमूर्ती रानडे या राष्ट्रभक्त नेत्याचे भाषण ऐकून वासुदेवाच्या मनात भारतमातेबद्दल अद्भुत प्रेम जागृत झाले. याचे फळ म्हणजे; वासुदेवाने इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलण्याची शपथ घेतली.
सरकारी नोकरी करतांना या तरुण स्वातंत्र्यसैनिकाने विदेशी अधिकाऱ्यांद्वारे भारतीय कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय जवळून पाहिला व अनुभवलेला होता. याच वेळी वासुदेवांच्या घरून पत्र आले, कि “तुझी आई भयंकर आजारी आहे. त्याकरिता तू त्वरीत घरी ये.” वासुदेव ते पत्र घेऊन इंग्रज अधिकाऱ्याकडे सुट्टी मिळण्याकरिता विनंती करण्यासाठी गेले. तेव्हा त्या अधिकाऱ्याद्वारे वासुदेव आणि त्याच्या आईबद्दल बोलल्या गेलेल्या अत्यंत खालच्या दर्जाच्या शब्दांनी वासुदेवांच्या मनात इंग्रजांविरोधात आधीच जी द्वेषाग्नि जळत होता; त्यात तूप ओतण्याचे काम केले.
वासुदेवांनी ते पत्र आणि विनंती-अर्ज इंग्रज अधिकाऱ्याच्या तोंडावर मारले व ते नोकरी सोडून घरी परतले. तोपर्यंत त्यांच्या आईची प्राणज्योत मालवली होती. वासुदेवांनी प्रतिज्ञा केली, कि ते या अमानवी प्रशासनाच्या विरोधात विद्रोहाच्या ठिगणीला जळजळत्या आगीत बदलून टाकतील. याच दिवसांमध्ये देशात भयंकर दुष्काळ पडला व लोक अन्न-पाण्याविना तळमळू लागले. लॉर्ड लिटन आणि लॉर्ड टॅम्पल यांच्या अत्याचारी प्रशासनाने अमानुषपणाच्या साऱ्या सीमा ओलांडल्या. भारताचा सर्व कच्चा माल इंग्लंडच्या यॉर्कशायर आणि लंकाशायर येथील कचेरींमध्ये पाठवण्यास सुरूवात झाली. ढाकामध्ये बनवल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध सूत कातणाऱ्या कामगारांचे हात कापण्यात आले. इंग्रजी व्यापाऱ्यांना ‘फ्री ट्रेड’च्या नावाखाली भारतीयांना मुक्तपणे लुटण्याची सूट देण्यात आली.
हा सर्व प्रकार पाहून वासुदेवांनी महाराष्ट्राच्या युवकांना सोबत घेऊन एक मोर्चा उभारण्याचे साहसी कार्य सुरू केले. याकरिता घर-परिवाराच्या सुखात बुडालेल्या युवकांनी मात्र साथ दिली नाही. शेवटी वासुदेवांनी मागास समजल्या जाणाऱ्या ग्रामीण जमातींवर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्रातील वीरव्रत असलेल्या ‘रामोशी’ जनजातीच्या नवयुवकांनी वासुदेवांना साथ दिली. अगदी कमी वेळात एक लहान; मात्र शक्तीसंपन्न सैनिकांची टोळी तयार झाली. याद्वारे इंग्रज सरकारला कर न देणे, इंग्रजांचा गावा-गावांमध्ये बहिष्कार करणे, इत्यादी प्राथमिक गतिविधींना मोठ्या स्तरावर देखील अंमलात आणल्या जाऊ लागले.
वासुदेवांच्या डायरीतील हे शब्द त्यांच्या उद्देशांवर प्रकाश टाकण्यासाठी पूरक आहेत; “जर मला पाच हजार रुपये मिळाले, तर मी आपल्या देशातील प्रत्येक सैनिकामध्ये विद्रोह निर्माण करण्यासाठी त्या पैशांचा उपयोग करीन. जर दृढ निश्चयवादी मनाचे १०० लोक मला येऊन भेटले, तर मी देशात एक चमत्कार घडवून आणू शकतो. जर भगवंताला पटलं, तर आपण भारतात एका स्वतंत्र भारतीय प्रजासत्तेची स्थापना करू शकतो.” हे लक्षात घ्यायला हवं, कि १८५७ मध्ये भारतीय सैनिकांनी ‘स्वधर्म आणि स्वराज्य’ हा नारा दिला होता, तेव्हा वासुदेवांनी याला पुढे चालवत, स्वतंत्र भारतीय प्रजासत्तेचा बिगुल वाजवला.
वासुदेवांच्या सैनिकी तुकड्यांनी ब्रिटीश सरकारच्या कार्यालयांवर, चौकींवर आणि इतर सरकारी ठिकाणांवर तात्काळ हल्ले करण्याची गती वाढवली. या सैनिकांनी तोमर तसेच धामरीच्या इंग्रज सैनिकी छावण्यांवर आणि किल्ल्यांवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. पुढे ही सेना पूर्ण ताकदीने आणि एकत्रितपणे कार्य करत गेली.
याच दिवसांत वासुदेवांनी श्रीमंत लोकांच्या नावें एक जाहीरनामा काढला; “तुम्ही आपल्या अमाप संपत्तीतून काही प्रमाणात धन आपल्या देशासाठी द्या. तुम्ही जर आपले कर्तव्य पूर्ण करत नसाल, तर मला तुमच्याकडून हे धन बळजबरीने हिसकावून घ्यावे लागेल. या ईश्वरी कार्यासाठी शक्तीपूर्वक तुमच्याकडून धन काढून घेण्यात मी कसलेही पाप समजत नाही. तुम्ही विदेशी प्रशासनाला कर देता; मग मीही स्वातंत्र्याच्या युद्धासाठी तुमच्याकडून धन मागण्याचे वा हिसकावण्याचे कुठले पाप करीत आहे? आपण याला; मला दिले गेलेले कर्ज समजा. स्वराज मिळाल्यानंतर आम्ही आपल्याला व्याजासहीत आपली रक्कम परत करू.”
वासुदेवांच्या या सरकारविरोधी कृत्यांना थांबवण्यासाठी इंग्रज पोलीस अधिकारी एका गुप्त ठिकाणी चर्चेसाठी एकत्र आले. वासुदेवाच्या गुप्तहेरांद्वारे याची सूचना मिळताच, वासुदेवांच्या सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. सर्व अधिकऱ्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. सद्यठिकाणावरील संपत्ती लूटून त्या ठिकाणाला जाळून टाकण्यात आले. आता तर वासुदेव आणि त्याच्या सैन्याद्वारे केल्या जाणाऱ्या सशस्त्र क्रांतीच्या चर्चा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा बातमी स्वरूपात झळकू लागल्या.
इंग्रज प्रशासन गोंधळून गेले होते. तितक्यात मुंबईच्या भिंतींवर पत्रक झळकू लागले, “जो वासुदेवाला जीवंत किंवा मरणावस्थेत पकडून देईल, त्याला पोलीस अधिकारी रिचर्डद्वारे ५० हजारांचे बक्षीस दिले जाईल.” दुसऱ्याच दिवशी लोकांनी एक अशाच प्रकारचे पत्रक पाहिले, “जो कुणी बेईमान रिचर्डचे मुंडके कापून आणून देईल, त्याला वासुदेव ७५ हजार रुपये बक्षीस म्हणून देतील.” यावरून शहरात गोंधळ माजला. संपूर्ण मुंबईत १४४ कलम लागू करण्यात आले. वासुदेव आपल्या सैनिकांसमवेत भूमिगत होऊन संघर्षाला आणखी जास्त प्रमाणात प्रचंड बनविण्याची योजना बनवू लागला. सरकारी दलाल व फितूर पत्रकार वासुदेवांचा लूटमार आणि गुंड म्हणून उल्लेख करू लागले.
भूमिगत राहून पोलिसांच्या देखरेखीतून वाचून आपल्या सैन्याच्या गतिविधींचे संचालन करणे; किती धोकादायक आणि कठीण काम असेल, याची माहिती वासुदेवांच्या डायरीत मिळते; “आपल्या रामोशी सैनिकांबरोबर डोंगराळ भागात पळतांना, पडतांना प्राण वाचले. कितीतरी दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही. झाडाझुडुपांमध्ये दिवसभर लपून राहिल्यामुळे पाण्याचा थेंब सुद्धा नशिबात नाही. तरीही आम्ही आपले राष्ट्रीय दायित्व निभावण्यापासून एकही पाऊल मागे हटणार नाहीत.”
वासुदेवांद्वारे सुरू झालेल्या या जनक्रांतीला घाबरून सरकारने डेनियल नामक एका अतिशय भयानक प्रवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्याची वासुदेवांना ताब्यात घेण्यासाठी नियुक्त केले. एका रात्री वासुदेव; गोगाटे या आपल्या जवळच्या मित्राच्या घरी मुक्कामासाठी थांबलेले असतांना, ही बातमी मित्राच्या पत्नीने गावातील स्त्रियांना सांगितली. पुढे हीच बातमी डेनियलपर्यंत पोहचली. डेनियल आपल्या सैनिकांसोबत तिथे येऊन धडकला. कसे-बसे पोलिसांच्या तावडीतून सुटून वासुदेव पळून गेले. थकलेल्या-विखुरलेल्या आजारी शरीरासोबत ते धावत-धावत आपला मित्र साठे याच्या घरी शरण घेण्यासाठी आले आणि त्यांनी पोटासाठी अन्नाची मागणी केली. मात्र ना घराचा दरवाजा उघडला, ना कित्येक दिवसांची भूक शमवण्याकरिता एखादी पोळी मिळाली!
आजारी, उपाशी आणि थकलेला हा क्रांतीयोद्धा गावाच्या मंदिरात येऊन झोपला. डेनियल सुद्धा पाठलाग करत-करत त्याच मंदिरात पोहोचला. त्याने त्या झोपलेल्या सिंहाच्या छातीवर मजबूत पदवेशाचा भार दिला. क्रांतीसिंहाला साखळदंडाने बांधून अटक करण्यात आली. या क्रांतिकारक देशभक्ताला न्यायालयात सादर करण्यात आले. त्याच्यावर राजद्रोहाचे सर्व खटले आणि कलम लावण्यात आले. उल्लेखनीय आहे, कि वासुदेवांना पकडणाऱ्या डेनियलला हैद्राबादच्या निजामाने ५० हजार रूपये बक्षीस म्हणून दिले. न्यायालयाने वासुदेवांना दोषी घोषित करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तीन वर्षांपर्यंत तुरुंगात घोर अमानवी यातना सहन करत-करत वासुदेव जवळपास प्राणहीन झाले होते. एका रात्री ते कारागृहाची भिंत फोडून निघून गेले. पोलीस पाठलाग करत होते. ते पकडल्या गेले आणि पुन्हा त्यांना तुरुंगात अमानुषपणे डांबण्यात आले. एका रात्री पोळी भाजणाऱ्या उलथण्याद्वारे भारताच्या या स्वातंत्र्यसैनिकाला वाईट पद्धतीने मारण्यात आले. त्यादरम्यान वासुदेव; “क्रांती अमर रहे, इंग्रज देश से निकल जाओ” असा उद्घोष करत राहिले. आणि मग एका दिवशी या महान योद्ध्याने भगवंताजवळ प्रार्थना केली, कि “हे परमेश्वरा; मला पुढील जन्मात पुन्हा मनुष्य जन्म दे, जेणेकरून मी पुन्हा स्वातंत्र्यसंग्रामात एका सैनिकाच्या नात्याने देशासाठी आपले बलिदान देऊ शकेन” आणि असं म्हणत वासुदेवांनी प्राण सोडला. रक्तरंजित झालेल्या त्यांच्या पार्थिव देहाबद्दल इतिहासाच्या कुठल्याच पुस्तकात नोंद मिळत नाही.
वासुदेव बळवंत फडकेंच्या उदात्त हौतात्म्यावर त्यांच्या वीरपत्नी बाईसाहेब फडके म्हणतात, कि “माझ्या पतीला गुंड म्हणणे; हा समस्त स्वातंत्र्यसैनिकांचा आणि क्रांती-समर्थक भारतवासियांचा घनघोर अपमान आहे. माझ्या पतीने देशाकरिता आपले जीवन समर्पित केले आहे. हे कार्य दधिचींद्वारे समाजासाठी जिवंतपणी आपल्या अस्थी समर्पित करण्यासारखे आहे.” हे जाणून घेणे गरजेचे आहे, कि वासुदेवांनी आपल्या पत्नीलाही तलवार, बंदूक व इतर शस्त्रांचे प्रशिक्षण दिले होते. वासुदेवांच्या घराबाहेर राहण्यावर या महान स्त्रीला किती कष्ट तसेच यातना सहन कराव्या लागल्या असतील; याचा अंदाज ते लोकं नाही लावू शकत, जे आजही आपल्या देशासाठी प्राण अर्पित करणाऱ्या या क्रांतिकारक हुतात्म्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्वीकार करत नाहीत.
वासुदेव बळवंत फडके; १८५७ च्या संग्रामानंतरचे देशासाठी बलिदान देणारे पहले क्रांतिकारक होते. महासंग्राम अयशस्वी ठरल्यानंतर वासुदेव पहिले राजनैतिक तुरुंगवासी होते, ज्यांना इंग्रजांनी तुरुंगातच त्रास देऊन मारून टाकले. ते पहिले क्रांतिकारक देशभक्त होते, ज्यांनी
इंग्रज सत्तेचा कायापालट करण्यासाठी गोरिला युद्धाचे तंत्र अंमलात आणले. वासुदेवच ते पहिले क्रांतिकारक होते, ज्यांनी स्वतंत्र भारतीय प्रजासत्तेच्या स्थापनेला सशस्त्र क्रांतीचा उद्देश म्हणून घोषित केले होते. देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपले जीवन सर्वस्वी समर्पित करून वासुदेवांनी सशस्त्र क्रांतीची पेटती मशाल भविष्यातील क्रांतिकारकांच्या हाती सोपविली.
अमर रहे वासुदेव!
क्रमश:
– नरेंद्र सहगल
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार.
मराठी अनुवाद – अविनाश काठवटे