सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग- ८
विसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाची सुरुवात होताच, जगावर विश्वयुद्धाच्या काळ्या ढगांची सावली पडू लागली. या ढगांनी भारतावर आपली अधिनायकवादी सत्ता थोपणाऱ्या इंग्लंडच्या अस्तित्वावर प्रश्नचिह्न उठवले. देश आणि विदेशात सक्रिय भारतीय क्रांतिकारकांनी यादरम्यान भारतात १८५७ सारख्याच एका स्वातंत्र्यसंग्रामाची तयारी सुरू केली. या संभाव्य देशव्यापी स्वातंत्र्यसंग्रामाचे संचलन करण्यासाठी पुरेश्या धनाची व हत्यारांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. या सशस्त्र क्रांतीला यशस्वीपणे संचलित तसेच नियंत्रित करण्यासाठी गुप्त ठिकाणांची निवड देखील करण्यात आली आणि क्रांतिकारकांद्वारे केल्या जाणाऱ्या अत्यंत हिंस्रक पद्धतींचीही एक श्रृंखला निश्चित करण्यात आली.
विश्वयुद्धाची चाहूल लागताच, इंग्रजांनी घाबरून कलकत्त्याऐवजी दिल्लीला भारताची राजधानी बनविण्याचा निर्णय घेतला. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या कलकत्त्यात असाही इंग्रजी प्रशासनाच्या विरोधात असलेला रोष दिवसेंदिवस वाढतच जात होता. दररोजच्या बाँब हल्ल्यांमुळे ब्रिटीश प्रशासकही गोंधळून गेले होते. या भयावह परिस्थितीचा सामना करण्यासाठी जॉर्ज पंचमला भारतात पाठविण्यात आले. १२ डिसेंबरला दिल्लीत जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी एक मोठा समारोह आयोजित करण्यात आला. या वैभवशाली समारोहात असे प्रदर्शन करण्यात आले; जणू भारतात अत्यंत शांततापूर्ण वातावरण आहे आणि दिल्लीवासी सुद्धा ब्रिटीश प्रशासनामुळे प्रसन्न व सुखी आहेत. याप्रकारे सहानुभूती व सद्भावनेचे वातावरण निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. क्रांतिकारकांनी ‘हा देशाचा अपमान आहे’, असे समजले.।
क्रांतिकारक; एखादा मोठा स्फोट करून जगाला हे दाखवू इच्छित होते, कि भारतात इंग्रजांच्या विरोधात लढल्या जात असलेला स्वातंत्र्यसंग्राम संपलेला नसून, आणखी तीव्र होत जात आहे. ३ डिसेंबर १९१२ रोजी व्हाईसराय लॉर्ड हार्डिंग मोठ्या लष्करसेनेसोबत दिल्लीत प्रवेश करणार होता. व्हॉईसरायच्या स्वागतासाठी दिल्लीला सजविण्यात आले. सरकार या अभूतपूर्व व भव्य प्रदर्शनातून असे दाखवत होते, कि शक्तीमान ब्रिटीश साम्राज्याला उपटून टाकणे; अगदी अशक्य आहे. व्हॉईसरायला टांग्यात बसवून एका मोठ्या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात तोफा, बंदुका आणि अन्य हत्यारबद्ध सेना व पोलिसांच्या तुकड्या चालत होत्या. हजारो इंग्रजभक्त दिल्ली निवासी सुद्धा या प्रदर्शनात चालत होते.
देशभक्त क्रांतिकारकांना हा इंग्रजी गोंधळ आव्हान देत होता. ते देखील जगाला हे दाखवून देऊ इच्छित होते, कि जोपर्यंत भारत इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त होत नाही, तोपर्यंत भारतीय पूर्ण ताकदीने लढत राहतील. इकडे इंग्रजांद्वारे क्रांतिकारिकांना घाबरवण्यासाठी व देशवासियांवर आपल्या शक्तीचा धाक थोपवण्यासाठी दिल्लीत भव्य समारोह आयोजित करण्यात आला. लॉर्ड हार्डिंग चारही दिशांनी आपली जयजयकार ऐकून खुश झाला. त्याला वाटत होते, कि ब्रिटीश साम्राज्यवाद अजरामर आहे.
तितक्यात एक मोठा स्फोट झाला. भव्य मोर्चा चांदणी चौकात पोहोचताच, जवळच्या इमारतीत लपून बसलेला एक क्रांतिकारक; वसंतकुमारने लॉर्डवर बाँब फेकला. लॉर्ड अगदी वाईट प्रकारे घायाळ होऊन खाली कोसळला पण तो बचावला. त्याचा अंगरक्षक यात मारल्या गेला. याप्रकारे प्रदर्शन, मोर्चा आणि भव्य स्वागताचा फज्जा उडाला. तमाम सरकारी तमाश्यावर पाणी फेरण्यात आले. स्फोटामुळे कित्येक इंग्रजभक्त लोकंही घायाळ झाले.
इंग्रजांच्या सैन्याने व पोलिसांनी; दिल्लीला चारही दिशांनी घेरून, बाँब फेकणाऱ्यांना शोधणे; सुरू केले. घराघरात घुसून शोध मोहीम चालवली गेली. लाखों प्रयत्नांनंतरही सरकारच्या हातीं काहीच लागले नाही. बाँब फेकणारे सुरक्षितपणे पळ काढण्यात यशस्वी झाले. ही घटना म्हणजे ब्रिटीश प्रशासकांसाठी एक संदेश होता, कि येणाऱ्या दिवसांत स्वातंत्र्ययुद्ध अधिक गतिमान होऊन संपूर्ण देशात पसरेल. ही सर्व योजना त्याच रासबिहारी बोसांनी बनवली होती, ज्यांनी पुढे चालून आजाद हिंद सेनेची निर्मिती केली.
दिल्लीच्या चांदणी चौकात व्हॉईसरायवर केलेल्या बाँबहल्ल्याचा आवाज अजून इंग्रजांच्या डोक्यात आणि मनात निनादतच होता, तितक्यात क्रांतिकारकांनी १३ मे १९१३ रोजी लॉरेंस बागेत होणाऱ्या इंग्रजांच्या एका मोठ्या संमेलनात बाँबस्फोट घडवून आणला. या घटनेच्या काही दिवसांनंतर गर्दी असणाऱ्या भागांमध्ये, मद्रेश्वर, नैमन सिंह आणि मौलवी बाजार मध्येही क्रांतिकारिकांनी मोठे बाँबस्फोट केले. सरकार गोंधळून गेले, कि हे बाँब नेमके बनत कुठे आहेत? हे बाँब कोण बनवत आहे? कोण कुणाच्या मार्गदर्शनाखाली याचा उपयोग करत आहे? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी सरकारने हेरांचे जाळे पसरवले.
सरकारला कळून चुकले होते, कि बाँबच्या सर्व घटनांचे मार्गदर्शक आणि संचालक रासबिहारी बोस आहेत. म्हणून पोलीस; बोस यांना पकडण्यासाठी त्यांच्या घरी गेले, तेव्हा रासबिहारी त्यांच्या हातावर तुरी देऊन पळाले. पण त्यांच्या घराची पाहणी केल्यावर पोलिसांना काही महत्त्वपूर्ण कागदपत्र मिळाले. बोस यांच्या घरातून काही बाँब आणि क्रांतिकारी पत्रेही मिळाली. याच माहितीच्या आधारावर बाँबस्फोटाच्या कार्यवाहीत सामील असलेले मास्तर अमीरचंद, अवधबिहारी आणि सुल्तान चंद पकडल्या गेले. पोलिसांच्या हाती एक असे पत्र लागले, जे अवधबिहारींद्वारे आपल्या साथीदाराला; दीनानाथला लिहिलेले होते.
दोन-चार दिवसांच्या धावपळीनंतर दीनानाथलाही पकडण्यात आले. या भ्याड क्रांतिकारकाने बॉंबस्फोटाचे सर्व धागे मोकळे केले. याप्रकारे मास्तर अमीरचंदांनी पदरीं घेतलेल्या सुल्तानचंदनेही बाँबस्फोटाचे सगळे रहस्य उलगडून ठेवले. खरंतर हे दोन्ही भ्याड क्रांतिकारक; पोलिसांद्वारे दिल्या गेलेल्या यातनांना सहन करू शकले नाही. या दोघांच्या फितुरीमुळे लॉर्ड हार्डिंगवर झालेल्या बाँबस्फोटाचे सगळे सूत्र सरकारच्या हातीं लागले. परिणामस्वरूप; या दलाचे अन्य क्रांतिकारक, बालमुकुंद, लाला हनुमंत सहाय्य, चरणदास, बलराज यांनाही अटक करण्यात आली.
या सर्व क्रांतिकारक देशभक्तांना कारागृहात यातना देण्यासाठी इंग्रजी सत्र सुरू झाले. सरकार यांच्या मधून बॉम्बस्फोटाच्या खऱ्या सूत्रधाराला म्हणजेच रासबिहारी बोस यांना पकडू इच्छित होती. परंतु सरकारी यंत्रणांना लवकरच लक्षात आले, कि हा तर कणखर क्रांतिकारक आहे आणि स्वातंत्र्याच्या या संग्रामात याने स्वेच्छेने हा कठीण मार्ग स्वीकारला आहे. हेच यांचे मोक्ष प्राप्तीचे साधन आहे.
विविध प्रकारे छळ करून, त्यांच्या तोंडून क्रांतीची पार्श्वभूमी वदवून घेण्यात असफल ठरलेल्या १३ पोलीस अधिकाऱ्यांनी, आरोपी क्रांतिकारकांवर खून, डाका, बाँबस्फोट, राजद्रोह इत्यादी प्रकारचे कलम लावून त्यांच्यावर खटला चालवला. आश्चर्यचकित करून टाकणारी अनेक उदाहरणे समोर आली. स्वार्थ, लोभ आणि बंडखोरी कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय आला; जेव्हा मास्तर अमीरचंद यांचा दत्तक पुत्र सुल्तानचंदच स्वतः टच्या वडीलांविरुद्ध साक्ष देऊ लागला. स्वतःच्या वडिलांना फाशीपर्यंत घेऊन जाणारा हा कुपुत्र सुल्तानचंद नंतर माहिती पुरवण्याचा पैश्यांनी दिल्ली मध्ये मौज-मजा करत राहू लागला.
या वीर देशभक्तांवर लादण्यात आलेला बाँबस्फोटाचा हा खटला पूर्ण महिनाभर चालला. आपल्याच देशातील कारागृह, आपल्याच देशातील पहारेकरी आणि कर्मचारी असूनगी कारागृहात गुंड असल्यासारखा व्यवहार करण्यात येत होता. हेच या स्वातंत्र्यसैनिकांचे विडंबन आणि व्यथा होती. एवढे सगळे होऊन सुद्धा त्यांनी न्यायालयात खूप धाडसाने आपल्या वीरतेचा प्रत्यय दिला. न्यायाधीश, वकील आणि सर्व माहितीदारांमध्ये निधड्या छातीने ‘भारत माता की जय’, ‘क्रांती अमर रहे’ आणि ‘इंग्रज भारत छोड़ो’ अशा गगनभेदी घोषणांनी न्यायालयाच्या भिंती सुद्धा हादरू लागल्या.
शेवटी न्यायालयाचे नाट्यकरण ५ ऑक्टोबर १९१४ ला संपले. न्यायालयाने तोच निर्णय दिला ज्याची कल्पना या आरोपींनी, देशातील लोकांनी आणि पुढाऱ्यांनी केली होती. भाऊ बाल मुकुंद, मास्तर अमीरचंद, अवध बिहारी आणि वसंत कुमार यांना मृत्यूदंड देण्यात आला.
मृत्युदंडाची शिक्षा भोगणारे वसंत कुमार हे केवळ २१ वर्षांचे तरुण होते. बंगालच्या नादिया जिल्ह्यात राहणाऱ्या वसंत कुमारांना आधी आजीवन कारावासाची शिक्षा दिली गेली होती. परंतु सरकारने अपील केल्यानंतर या तरुणाला सुद्धा मृत्युदंड देण्यात आला.
फाशीच्या सुळावर जाणारा अवध बिहारी कॉलेजचा विद्यार्थी होता. फाशी देण्याआधी त्याला विचारले गेले, “तुझी शेवटची इच्छा काय आहे?” त्याने गर्जून सांगितले, “माझी शेवटची इच्छा हीच आहे, कि इंग्रजांचे राज्य नष्ट व्हावे.” इंग्रज अधिकारी म्हणाला, “निदान शेवटच्या क्षणीं तरी शांततेत मरणाला स्वीकार.” तेव्हा अवधबिहारीने पुन्हा गर्जना केली, “शांती कसली? माझी तर इच्छा आहे, कि एक विनाशकारी आग भडकली पाहिजे. त्या आगीत तुम्ही सगळे होरपळल्या गेले पाहिजेत, मीही आणि भारताचे पारतंत्र्य सुद्धा त्याच भग्न व्हायला पाहिजे व त्या आगीत माझा स्वतंत्र भारत बावनकशी सोन्यासारखा चमकायला हवा.”
मास्तर अमीरचंद दिल्लीतील एका उच्चस्थ आणि सम्मानित परिवारातील होते. त्यांना लाला हरदयाल यांनी क्रांतीचे शिक्षण देऊन दिल्लीच्या क्रांतिकार्याची धुरा सोपवली होती. मास्तर अमीरचंद मिशन स्कूलमध्ये शिक्षक होते. या अत्यंय सज्जन प्रवृत्तीच्या मास्तरांनी दिल्लीमध्ये सशस्त्र क्रांतीचे जाळे पसरवले होते.
फासावर जाणारे चौथे नाव होते; भाई बाल मुकुंद. ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले प्रसिद्ध हिंदू नेता भाई परमानंद यांचे लहान बंधू होते. भाई बालमुकुंद यांनी बी.ए. ची पदवी घेतल्यानंतर प्रसिद्ध देशभक्त लाला लजपतराय यांच्या मार्गदर्शनाखाली देशसेेवेचे व्रत घेतले होते. धाडसी आणि देशासाठी समर्पित झालेले भाई बालमुकुंद; आपल्या फाशीची शिक्षा ऐकल्यानंतर इंग्रज न्यायाधीशाला म्हणाले, “आज मला अत्यंत आनंद होत आहे. कारण याच शहरात जिथे आमचे मूळपुरुष भाई मतिदास यांनी देश आणि धर्मासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते, मी सुद्धा त्याच हेतूने आपल्या जीवनाचा त्याग करीत आहे.”
उल्लेखनीय गोष्ट ही आहे, कि बालमुकुंद यांची पत्नी रामरखी जेव्हा आपल्या पतीला भेटण्यास जेव्हा कारागृहात आली होती, तेव्हा तिने पाहिले, कि तिचा देशभक्त पती जमिनीवर घोंगडी अंथरून झोपतो. मातीमिश्रित कणकेची पोळी आणि डाळ खातो. रामरखीने सुद्धा घरी येऊन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमिनीवर घोंगडी अंथरून झोपण्यास सुरुवात केली. तीही मातीमिश्रित कणकेची पोळी खाऊन आपली भूक शमवू लागली. आपल्या पतीसाठी यातना सहन करण्यात ती सुद्धा आनंद मानू लागली. ज्यादिवशी तिच्या पतीला फाशी देण्यात येणार होती, त्यादिवशी ती सकाळी लवकर उठली. स्नानादि आटोपून साज शृंगार गेला. लग्नातले लाल वस्त्र नेसून ती बाहेर चौथऱ्यावर ध्यानस्थ बसली. तिकडे तिच्या पतीचे शरीर फासावर लटकले आणि इकडे रामरखीनेही आपला प्राण सोडला. या पती-पत्नींवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. रामरखी क्रांतिकारक तर नव्हती परंतु ती अमर झाली. ही; देशप्रेम आणि पतीप्रेमाची मार्मिक कथा आहे.
क्रमश:
नरेंद्र सहगल
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार
मराठी अनुवाद – धनश्री कुलकर्णी