जळगाव लाईव्ह न्यूज । प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगावातील भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने दोन महत्त्वाच्या नवीन रेल्वे गाड्या सुरू केल्या आहे. यामुळे जळगावकरांना आता प्रभू श्रीराम यांच्या पावन नगरीसाठी (अयोध्या) आणि धार्मिक महत्त्व असलेल्या काशीसाठी थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातून अयोध्या आणि वाराणसी (काशी) येथे जाण्यासाठी थेट रेल्वे गाडी असावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात होती. हीच बाब लक्षात घेऊन खासदार स्मिताताई वाघ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, रेल्वे विभागाने नुकत्याच दोन नवीन ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ एप्रिल रोजी बनारस–पुणे (हडपसर) व अयोध्या–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ झाला. यानंतर या गाड्या काल २९ रोजी भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यादरम्यान, भुसावळ येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी तर जळगाव येथे खासदार स्मिताताई वाघ यांनी गाडयांना हिरवा झेंडा दाखवत पुढील प्रवासासाठी रवाना केल्या.
बनारस–हडपसर (पुणे) ही गाडी दररोज धावणार असून अयोध्या–लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. या दोन्ही गाड्या जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावणार असल्याने जळगावातील भाविकांना आता थेट प्रभू श्रीरामाच्या नगरीत आणि काशीमध्ये पोहोचता येणार आहे.









