जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांचा गहू खरेदी करताना मापात पाप करणाऱ्या मंगरूळ (ता.अमळनेर) येथील आर.के. फूड्स कंपनीला कृषी उत्पन्न बाजार समितीने सील लावले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा आरोप होत असून तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे वजन माप निरीक्षकांनी १३ जानेवारीला वजन काटा पास केला होता.

नेमका प्रकार काय?
अमळनेर तालुक्यातील सोनखेडी येथील दीपक देविदास पाटील यांनी आपला गहू मंगरूळ येथे आर.के.फूडसमध्ये विक्रीला आणला असता त्यांचा माल ५० ते ५५ क्विंटल भरणे अपेक्षित होता. मात्र कंपनीत वजन केले असता तो फक्त ४१ क्विंटल भरला. तर गंगापूरी येथील रवींद्र पाटील यांचाही गहू प्रत्यक्ष वजनापेक्षा कमी भरला. वजनाची तफावत शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार केली

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर बाजार समितीचे सभापती तसेच सचिव व पोलीस घटनास्थळी पोहोचले. कंपनीच्या काट्यावर वजन मोजले असता २०० क्विंटल वजन फक्त ९० क्विंटल भरले आणि १०० क्विंटलचे ४० क्विंटल भरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने उपस्थितांसह शेतकऱ्यांना प्रचंड संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे वजन-माप निरीक्षकांनी १३ जानेवारी रोजीच या कंपनीचा वजन काटा तपासून ‘पास’ केल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, संबंधित कंपनीला कृषी उत्पन्न बाजार समितीने सील ठोकले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. याबाबत बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की, हे प्रकरण वांधा समितीसमोर ठेवण्यात येणार असून संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आतापर्यंत किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे याचीही सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.











