जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२१ । चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी फीडरचा वीजपुरवठा 50 तास बंद राहिला आणि सहायक अभियंत्याने लोकप्रतिनिधींबाबत वक्तव्य केले या आरोपात कसलेही तथ्य नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
धानोरा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून निघणारा ११ केव्ही कुंड्यापाणी फिडर २ जून रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास दोन गाळ्यातील तारा तुटल्याने बंद पडला. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी या फिडरवर प्रधान तंत्रज्ञ तायडे यांनी परमिट साडेआठ वाजता घेतले. बिघाड झालेल्या भागाआधीचा कट पॉईंट ओपन करून साडेनऊ वाजता फीडर सुरू करण्यात आला. त्यावरील १५ रोहित्रे सुरू करण्यात आले. दोन गाळ्यामधील तारा तुटल्याने तसेच रात्री उशिरा हे मोठे काम करणे शक्य नसल्याने ८ रोहित्रे बंद ठेवावे लागली. ३ जून रोजी सकाळी प्रधान तंत्रज्ञ तायडे यांनी सव्वाआठ ते साडेदहापर्यंत परमिट घेतले. तुटलेल्या तारा जोडून बिघाड दुरुस्त केला आणि संपूर्ण कुंड्यापाणी फीडरचा वीजपुरवठा सुरळीत केला. याव्यतिरिक्त या फीडरवर वीजपुरवठा खंडित झालेला नाही.
यासंबंधी प्रकाशित झालेल्या बातमीत सहायक अभियंता सूरज मंडोधरे यांच्या तोंडी घातलेली वाक्ये धादांत खोटी आहेत. मंडोधरे यांनी लोकप्रतिनिधींविषयी कसलेही वक्तव्य केले नसतानाही केवळ वैयक्तिक आकसापोटी हे आरोप करण्यात आलेले आहेत. तसेच 50 तास वीजपुरवठा बंद राहिल्याच्या दाव्यातही तथ्य नसल्याचा निर्वाळा महावितरणने दिला आहे.