जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२२ । भारतात, कोरोना विषाणूचा संसर्ग हळूहळू कमी होऊ लागला असून आता दररोज दोन हजारांहून कमी रुग्णांची नोंद होत आहे. याच पार्श्वभूमीवर, सरकारने जवळपास दोन वर्षांनंतर 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखण्याचे नियम लागू राहतील. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबतचा निर्णय घेतला.
निर्बंध हटवण्याचा निर्णय घेत असताना आरोग्य मंत्रालयाने स्थानिक परिस्थितीनुसार प्रशासनाला काही अधिकार दिले आहेत. ‘जर एखाद्या राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली तर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ते राज्य निर्णय घेऊ शकते,’ असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला.
२४ मार्च २०२० रोजी पहिल्यांदाच, केंद्र सरकारने देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, (DM कायदा) 2005 अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानंतर परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलही केले होते. आता देशभरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून यामुळे लादलेले सर्व निर्बंध 31 मार्चपासून रद्द केले जात आहेत. त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत.
भारतात गेल्या २४ तासांत २ हजार ५४२ रुग्ण करोनामुक्त झाले असून आता एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ४,२४,७३,०५७ झाली आहे. मागील २४ तासांत १ हजार ७७८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोव्हिड प्रतिबंधक लसीचे १८१ कोटी ८९ लाख डोस देण्यात आले आहेत. भारतात सध्याच्या स्थितीत २३ हजार ०८७ सक्रीय रुग्ण आहे. सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या ०.०५ टक्के इतके आहे.