जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । रिक्षा लावण्याच्या कारणावरून चक्क दोघा भावांमध्ये जबर हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना शिरसोली रोडवरील विनोबा नगरात घडली आहे. याबाबत दोन भावांवर परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
उमेश लालसिंग परदेशी आणि निखील लालसिंग परदेशी असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा भावांचे नाव आहे. दोन्ही भाऊ हे शिरसोली रोडवरील मोहाडी फाट्याजवळी विनोबा नगरात शेजारी राहतात. दि. २० जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास निखील परदेशी यांनी त्यांच्या रिक्षा घराच्या गेटसमोर पार्क करून लावली होती. या कारणावरून शेजारी राहणारा भाऊ उमेश परदेशी आणि त्याची पत्नी मेघा उमेश परदेशी यांनी अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली.
तर प्रतिकार म्हणून निखील परदेशी आणि त्याची पत्नी अपेक्षा निखील परदेशी यांनी देखील दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत दोन्ही कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीसात रात्री १०.३० वाजता धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधात चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.