पहिल्याच प्रयत्नात UPSC सर; एरंडोलच्या आकाशने मिळवला देशात ७३ वा क्रमांक

मार्च 7, 2026 11:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आकाश ओम त्रिवेदी (वय २३) याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. आयएएसच्या यादीत तो देशातून ७३ व्या स्थानी आला आहे. अत्यंत कमी वयात देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत त्याने मिळवलेले हे यश केवळ एरंडोलसाठीच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

akash trivedi

एरंडोल येथील अॅड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश याने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत बीटेक पदवी प्राप्त केली आहे. आयआयटीसारख्या देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थेत शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षांची दिशा ठरवली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची निवड देशातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था आयआयएम अहमदाबाद येथेही झाली होती. मात्र, कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या पगाराच्या नोकरीपेक्षा देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्याने नागरी सेवेचा मार्ग निवडला.

कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन असल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हे एरंडोलच्या आकाश ओम त्रिवेदी याने सिद्ध करून दाखवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत आकाशने देशपातळीवर ७३ वा क्रमांक पटकावून जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्याने मिळवलेल्या या यशाने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, आकाशच्या या यशामागे त्याच्या कुटुंबियांचेही मोठे योगदान आहे. त्याच्या शिक्षण प्रवासात पालक म्हणून ॲड. ओम त्रिवेदी आणि रेखा त्रिवेदी यांनी नेहमीच मित्रवत भूमिका घेतली. आकाशचा लहान भाऊ अभय हा देखील नागपूर येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठात (NLU) शिक्षण घेत आहे. आकाशच्या यशाची बातमी समजताच एरंडोलमध्ये पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्रिवेदी कुटुंबीयांची भेट घेऊन आकाशचे अभिनंदन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now