जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर बोलत असताना अजित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून मागच्या 45 दिवसात 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Sucuide) केल्या. या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकऱ्यांना का हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मागच्या महिन्यात अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्याबद्दल सभागृहात माहिती देऊन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत करावी अशी मागणीही अजित पवार यांनी पुन्हा केली. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला.












