शनिवार, डिसेंबर 2, 2023

शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपा युतीबाबत अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२३ । जर आम्हाला भाजपासोबत जायचं नव्हते तर २०१४ मध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवले. २०१७ रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आम्ही सगळे बंगल्यावर चर्चा झाली. सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील बैठकीत होते. कुठली खाती, पालकमंत्री पदे ठरली. निरोप आला, दिल्लीत बोलावले. वरिष्ठांसोबत बैठक झाली. २५ वर्षाचा आमचा मित्रपक्ष त्याला आम्ही सोडणार नाही असं भाजपाने सांगितले. शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपा असे सरकार राहील असं भाजपाच्या वरिष्ठांनी सांगितले. तेव्हा शिवसेना नको, ती जातीयवादी आहे असं आमच्या वरिष्ठांनी सांगितले. त्यानंतर हे सर्व बारगळले असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

त्याचसोबत २०१९ मध्ये ५ बैठका एका उद्योगपतीच्या घरी झाल्या. मला आणि देवेंद्र फडणवीसांना कुठेही बोलायचे नाही हे सांगितले. पहाटेच्या शपथविधीला काय झाले हे मला अनेकदा विचारले. हे सर्व सुरू असताना अचानक बदल झाला आणि मला शिवसेनेसोबत जायचे हे सांगितले. २०१७ मध्ये शिवसेना नको असं म्हणत होते मग अचानक २ वर्षात असा काय बदल झाला, विचारांचे अंतर असू शकते. मतमतांतरे असू शकते. नेहमी वेगवेगळी भूमिका असं चालत नाही असंही अजित पवार म्हणाले.

शरद पवारांच्या निवृत्तीबद्दल थेट भाष्य

मला लोकांच्या समोर व्हिलन का केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? या सगळ्या गोष्टी होत आहेत पण शरद पवार हे माझं दैवत आहेत. पण तुम्हीच मला सांगा एखादा माणूस महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर ५८ व्या वर्षी रिटायर्ड होतो. आयएएस, आयपीएस असेल तर ६० व्या वर्षी रिटायर्ड होतात. राजकारणात असेल तर भाजपात ७५ व्या वर्षी रिटायर्ड केलं जातं. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी ही उदाहरणं आहेत. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला?
मला हे सांगण्यात आलं की मी राजीनामा देतो, संस्था बघतो. त्यानंतर एक कमिटी करतो, त्या कमिटीत तुम्ही सगळे प्रमुख बसा. ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सांगितलं त्यालाही आम्ही तयार झालो. त्यानंतर दोन दिवसांत काय घडलं कुणास ठाऊक? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? मला महाराष्ट्राने सांगावं की आमच्यात धमक आहे की नाही? जे प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव शेवटी का होईना येतं ना? मग मला का आशीर्वाद का दिला जात नाही. शेतकरीही ६० वर्षांचा झाला की २५ वर्षांच्या मुलाला सांगितलं जातं आता शेती तू बघायची आणि आम्ही तुला सल्ला देऊ.