जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या ‘क्लीन एअर प्रोग्रॅम’ अंतर्गत हवेचे सर्वाधिक प्रदूषण करणारी शंभर शहरे निवडण्यात आली आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये हवेच्या गुणवत्तेसाठी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.

विस्तारणाऱ्या रेल्वे जंक्शनसह भुसावळमधील हवेची गुणवत्ता अधिक व्यापक पद्धतीने मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (एमपीसीबी) हवेची गुणवत्ता मोजणारी नवीन यंत्रणा उभारली जात आहे. पालिका शाळा हद्दीत उभारली जाणारी ही यंत्रणा येत्या दोन महिन्यांत कार्यान्वित होईल, असा विश्वास स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे.

योजनेच्या माध्यमातून या शहरांतील येत्या तीन वर्षात ३५ टक्क्यांनी, तर पाच वर्षात ५० टक्क्यांनी हवेचे प्रदूषण कमी करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले
आहे. यात भुसावळचा समावेश नाही. मात्र, भुसावळ रेल्वेचे जंक्शन असताना, नजीकच्या भागात औष्णिक वीज प्रकल्प असताना या शहरातील प्रदूषणाचा स्तर मोजण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगावमधील विवेकानंदनगरातील असलेल्या यंत्रणेच्या धर्तीवर भुसावळातही प्रयोग राबविला जाणार आहे. त्यादृष्टीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती सत्रांनी दिली.












