⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

..अखेर जि.प.च्या अनुकंपाधारकांना मिळाल्या नियुक्त्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । गेल्या ८ ते १० वर्षापासून प्रतीक्षायादीत असलेल्या उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा होती.मात्र,सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी पुढाकार घेत तब्बल ८७ जणांच्या नियुक्त्या समुपदेशनाने केल्या आहे, तर २५ परिचरांनादेखील कनिष्ठ क्लार्क पदावर बढती दिली.

जिल्हा परिषदे अंतर्गत विविध विभागांत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांचा वारस नियमानुसार अनुकंपा भरतीसाठी पात्र ठरतो. १४ रोजी छत्रपती शाहू महाराज सभागृहात ही भरती प्रक्रिया पार पडली.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अनुकंपाधारकांसह अन्य बढती पात्र उमेदवारांची सकाळपासून गर्दी झालेली होती.पंचायतराज समितीचा दौरा आणि दिवाळी सणामुळे अनुकंपाच्या नियुक्त्या लांबणीवर पडलेल्या होत्या.

मंगळवारी अखेर या कामाला मुहूर्त लाभला.तब्बल ८७ उमेदवारांच्या समुपदेशनाद्वारे मुलाखती घेऊन,त्यांचे नियुक्तीचे ठिकाण निश्चित करण्यात आले.आदेश जि.प.च्या संकेतस्थळावर रात्री उशिरापर्यंत प्रसारित होण्याची प्रक्रिया सुरू होती. बुधवारी नियुक्त कर्मचाऱ्यांना पदस्थापना मिळणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे पवार यांनी सांगितले.