⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

खा.संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीची सावध भूमिका, मोठ्या नेत्याने केला फोन..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि मनसे तर आक्रमक झालीच आहे शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते देखील संताप व्यक्त करीत आहेत. सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, अशामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले होते. राऊत यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने सावध भूमिका घेतली असून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी संजय राऊत यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला.

जयराम रमेश म्हणाले कि, मी सकाळीच संजय राऊतांशी बोललो, खूप दीर्घ चर्चा झाली. सावरकर प्रकरणावर त्यांचे आणि राहुल गांधींचे विचार वेगळे आहेत. मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास आहे असं बोलणं आमच्यात झाले आहे. त्यामुळे याचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही असं संजय राऊतांनी सांगितल्याचं जयराम रमेश म्हणाले. तिकडे संजय राऊत यांनीही जयराम रमेश यांनी फोन आल्याची माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले जयराम रमेश यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली बराच वेळ आम्ही फोनवर बोललो. काही विषयांवर नक्कीच मतभेद आहेत त्या संदर्भात आम्ही माहिती उद्धव ठाकरे यांना दिली आहे.

काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावरकरांवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेली वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाहीत. सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराचं आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी आहे, असे खा.संजय राऊत यांनी सांगितले होते. तसेच भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता, हा विषय नव्हता. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली असून आम्ही आमच्या भूमीवर ठाम आहोत आणि राहणार असल्याचे राऊत म्हणाले. आम्ही सावरकरांवर केलेली टिपणी सहन करणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशानंतर बुलडाण्यात जाऊन राहुल गांधींच्या शेगावातील सभेत निषेध नोंदवण्याचा निर्धार केला. बुलढाण्यात पोहचताच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना गावाबाहेर रवाना केले. दुसरीकडे मुंबई, ठाण्यात भाजपने रस्त्यावर उतरुन राहुल गांधींचा निषेध केला. मात्र मनसे-भाजप रस्त्यावर उतरले हे ढोंग आहे. राजकीय फायदे तोटे पाहून वीर सावरकरांवरून रस्त्यावर उतरण्याचं काहींचं काम सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले.

खा.राऊत पुढे म्हणाले, जर भाजपला वीर सावरकरांबाबत इतका मान असता तर सरदार वल्लभाई पटेल यांचा जसा पुतळा बनवला तसा पुतळा वीर सावरकरांचा दिल्लीमध्ये बनवला असता. आमची तर आजही सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी असल्याचे खा.संजय राऊत यांनी सांगितले.