शोधा-शोध सुरू असताना वडिलांना नको त्या अवस्थेत पाहून मुलीला बसला धक्का

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । दौलत नगरातील रहिवासी विठ्ठल किसन गजभार (५५) यांनी घराजवळील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून सकाळी शोधा-शोध सुरू असताना लहान मुलीला वडीलांचा मृतदेह दिसून आल्यानंतर आत्महत्येची घटना समोर आली.

विठ्ठल गजभार हे पत्नी, मुलगा व दोन मुलींसह दौलत नगर येथे वास्तव्यास होते. हातमजुरी करून कुटूंबाचा ते उदरनिर्वाह करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. रविवारी पहाटे त्यांनी घराजवळील एका मोकळ्या जागेत असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी घरामध्ये विठ्ठल गजभार हे दिसून आले नाही. म्हणून कुटूंबियांनी त्यांचा घरासह परिसरामध्ये शोध सुरू केला. मात्र, ते कुठेही मिळून आले नाही. अखेर सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास लहान मुलीला एका मोकळ्या जागेतील झाडाला वडीलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

कुटूंबियांचा आक्रोश…
मुलीने ही घटना इतर कुटूंबातील सदस्यांना सांगितली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती विठ्ठल गजभारे यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही.