⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | आरटीईअंतर्गत प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात; अशी पूर्ण करा प्रक्रिया

आरटीईअंतर्गत प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात; अशी पूर्ण करा प्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : ३ मार्च २०२३ : आरटीई (RTE)अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत १७ मार्च, रात्री १२ वाजेपर्यंत आहे. जळगाव जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २८२ शाळांनी नोंदणी केलेली असून, ३ हजार १२२ जागा उपलब्ध आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया कशी पुर्ण करावी?, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? याबद्दल पालकांना पुर्ण माहिती नसते. यामुळे आज आपण आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी प्रक्रिया कशी पुर्ण करावी, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अर्ज कसा करावा?
ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या शासकीय वेबसाईटवर जावं. त्याठिकाणी सर्वप्रथम या संकेतस्थळावर जा तेथे डाव्या बाजूला आरटीई २५% पोर्टल असा बॉक्स दिसेल. त्यावर क्‍लिक केल्यानंतर तुम्ही आरटीई २५ टक्के अ‍ॅडमिशनच्या पहिल्या टप्प्यावर जाल. तेथे गेल्यावर उजव्या बाजूला ऑनलाईन ऑप्लिकेशनवर क्‍लिक करावे. तेथे लॉगइन आयडी व पासवर्ड सेट केल्यानंतर पुढील प्रक्रिया पुर्ण करता येते. याशिवाय, प्रशासनाने नागरिकांना अर्ज करण्यास मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्रही निश्चित केले आहेत. याठिकाणी जाऊनही आपणास आपल्या पाल्याचा अर्ज भरता येऊ शकतो.

अर्जांची निवड कशी होते?
प्राप्त अर्जांची निवड ऑनलाईन स्वरुपातच लॉटरीच्या माध्यमातून होते. आपण अर्ज करत असलेल्या शाळेपासून जितकं जास्त जवळ आपण राहता, तितकी आपल्या अर्जाची निवड होण्याची शक्यता यामध्ये जास्त आहे. त्यासाठीचं लॉजिकही शासनाच्या वेबसाईटवर देण्यात आलं आहे. त्यानुसार, शाळेपासून पहिल्या एक किलोमीटरच्या परिसरात राहणार्‍या विद्यार्थ्यांचा रिक्त जागेसाठी प्राधान्याने विचार करण्यात येतो.

आवश्यक कागदपत्रे

तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन पात्र उमेदवारांचा प्रवेश अंतिम करण्यात येणार आहे. निवासी पुरावा, वंचित संवर्गाकरिता जात प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, घटस्फोटीत व विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे, एकल पालकत्व असल्यास आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. यामध्ये पालक निवासी पुराव्यासाठी शाळेच्या कार्यक्षेत्रातील भाडे करार सादर करू शकतील, पण तो दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी केलेला लागेल. जन्मतारखेचा पुरावा म्हणून वडील किंवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन देखील ग्राह्य धरले जाणार आहे.

निवासी पुरावा –
रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज देयक, टेलिफोन देयक, मालमत्ता कराचे देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.

जन्मतारखेचा पुरावा –
ग्राम पंचायत, मनपा, नपा यांचा दाखला, रुग्णालयातील एएनएम रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी व बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आई, वडील किंवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन.

प्रवेशाच्या इतक्या संधी –
पालक दिलेल्या तारखेला हजर झाले नाहीत, तर त्यांना पुन्हा दोन संधी मिळणार आहेत. बालकांना प्रवेशासाठी पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा. या समितीत गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व इतरांचा समावेश आहे. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीत अपात्र होतील त्यांची निवड रद्द केली जाणार आहे. त्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे दाद मागता येणार आहे. प्रवेशासाठी १० शाळांची निवड करायची आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.