⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

प्रशासन लक्ष देईना; त्र्यंबकनगरातील रहिवाशी बसणार उपोषणाला

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 3 मधील त्र्यंबकनगरमध्ये गटारींची अवस्था अतिशय खराब आणि दयनीय झालेली असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या भागात रस्ते आणि गटारीचे काम झालेले नाही, त्यामुळे तात्काळ गटारी व रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी त्र्यंबकनगरातील रहिवाशांकडून वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रहिवाशांकडून ५ ऑक्टोबरपासून उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील त्र्यंबकनगरात गटारींची अवस्था अतिशय खराब आणि दयनीय झालेली आहे. नगरपरिषदेकडे वारंवार तक्रार करूनही काम होत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, नगरपालिका प्रशासनाकडून चार महिन्यापूर्वी एका गटारीचे काम करण्यात आले होते, मात्र पहिल्याच पावसात पूर्ण गटार जमीनदोस्त झाल्याने या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामावर तात्काळ कारवाई करावी, त्र्यंबकनगरातील रस्ते व गटारी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून झालेले नाहीत, त्यामुळे तात्काळ गटारी व रस्त्याचे काम मार्गी लावावे, नगरपालिकेचे बांधकाम विभाग व आरोग्य विभाग या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आपण स्वतः या कामाकडे वैयक्तिक लक्ष देऊन हे काम मार्गी लावावे, अशी मागणी त्र्यंबक नगरातील रहिवाशांकडून मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देऊनही कार्यवाही नाही
पंधरा दिवसात म्हणजेच १ ऑक्टोंबरपर्यंत गटार व रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा होणाऱ्या पुढील परिणामाला नगरपालिका व मुख्याधिकारी हे जबाबदार राहतील, अशा आशयाचे निवेदन १५ सप्टेंबर रोजी देण्यात आले होते. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी त्या तक्रार अर्जाचे पहिले स्मरणपत्र देण्यात आले. मात्र प्रशासनाने कोणतीही दाखल न घेतल्याने दि. २७ सप्टेंबर रोजी दुसरे स्मरण पत्र देण्यात आले आहे. ४ ऑक्टोंबरपर्यंत काम सुरू न झाल्यास दि.५ ऑक्टोंबरपासून नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा प्रशांत पाटील व त्रंबकनगरातील रहिवाश्यांकडून देण्यात आला आहे.

काम अर्धवट सोडून कॉन्ट्रॅक्टरने काढला पळ
गेल्या वीस वर्षांपासून त्र्यंबकनगरातील रहिवासी टॅक्स भरत आहेत. पण गेल्या वीस वर्षांमध्ये त्र्यंबकनगरात ना रस्ता झाला आहे ना गटारी. भुयारी गटारीच्या कामासाठी रस्ते सुद्धा खोदून ठेवण्यात आले असून ते काम अर्धवट सोडून कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.