जळगाव लाईव्ह न्यूज । खरीप हंगामाच्या ऐन धामधुमीत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी कृषी विभागाने एक अत्यंत मोठी आणि धडक मोहीम राबवली आहे. जिल्ह्यात दर्जेदार खते, बियाणे आणि कीटकनाशके योग्य दरात मिळावीत यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ५८ कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ९ विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, २३ परवाने निलंबित, तर २६ परवानाधारकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे जिल्हाभरातील बोगसगिरी करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या थेट आदेशानंतर ही धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाथ म्हस्के आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील विशेष भरारी पथकांनी जिल्ह्यातील खत व बियाणे विक्री केंद्रांवर अचानक छापे टाकले.

तपासणीदरम्यान अनेक दुकानांमध्ये खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या विक्रीच्या नोंदी अपूर्ण असल्याचे आढळले. काही ठिकाणी साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही निदर्शनास आले. तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री, परवान्याच्या अटींचे उल्लंघन, साठा नोंदीतील त्रुटी आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या.या प्रकरणी संबंधित विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर सुनावणी घेऊन तपासणी अहवाल, पुरावे आणि विक्रेत्यांनी दिलेल्या खुलाशाची छाननी करण्यात आली. दोष सिद्ध झालेल्या प्रकरणांमध्ये नियमानुसार अंतिम कारवाई करण्यात आली.
चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक कारवाई
या विशेष मोहिमेत चाळीसगाव तालुका सर्वाधिक चर्चेत राहिला. येथे तब्बल २० कृषी सेवा केंद्रांवर विविध प्रकारच्या अनियमितता आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. उर्वरित कारवाया जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर करण्यात आल्या.
नियमभंग करणाऱ्यांना इशारा
कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू राहतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरुद्ध कोणतीही तडजोड केली जाणार नसून कठोर कारवाई कायम ठेवली जाईल.
शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
खते, बियाणे किंवा कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत पावती घेणे, दरपत्रकाची खात्री करणे आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.









