⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई; २१ हजाराचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । वाहनामध्ये घरगुती गॅसचा वापर करून काळाबाजार करणाऱ्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत २१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील बळीराम पेठेतील बळीराम गंगुबाई शाळेच्या गल्लीत एका पत्राच्या शेडमध्ये एका इसम बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये करीत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी दुपारी १ वाजता धाड टाकून नाजीम खान नयीम खान (रा. काट्या फाईल, शनीपेठ) याच्यावर कारवाई केली. या कारवाईत १७ हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रिक मोटार, दोन गॅस सिलेंडर असा एकुण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.