⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

गॅस एजन्सी लुटणार्‍या आरोपींना महागड्या दारू, कपड्यांसह विमानतळावरच अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील एच.पी.गॅस एजन्सीतून साडेचार लाखांचा ऐवज लांबवून पळ काढलेल्या आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांकडून महागड्या दारू,कपडे मिळून आले आहे.

चाळीसगावातील अशोक किसनचंद छाबडीया (५८) हे मालेगाव रोडवरील एच.पी.गॅस एजन्सीत कामाला आहेत. या एजन्सीत दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसर्‍या दिवशी बंकेत भरणा करण्याचे काम छाबडीया करतात. सोमवार, २५ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास छाबडीया हे नेहमीप्रमाणे डिलीव्हरी बॉयकडून पैसे घेऊन मोजत असताना दुकानाचे शटर वर करून भावेश मनोज माखीजा (२२, रा.उल्हासनगर) हा चाकू घेऊन मध्ये आला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून पैसे दे अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच तीन लाख ६५ हजारांची रोकड व हिरो होंडा कंपनीची दुचाकी घेवून संशयीताने पळ काढला होता. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीत हा गोवा गेल्याचे व २८ एप्रिल रोजी गोवा येथून विमानाने मुंबई येथे परत येणार असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस व पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयितास सहारा विमानतळ, मुंबई येथे अटक करण्यात आली. संशयित भावेश माखीजाने लूट केलेल्या पैशातून गोव्यात नवीन कपडे खरेदी केले तसेच गोवा येथून महागडी विदेशी दारू व अन्य साहित्य खरेदी केले होते. ते सर्व साहित्य तसेच बळजबरीने लांबवलेली दुचाकी मिळून ३ लाख १३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सहा.पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, नाईक भूषण पाटील, विजय पाटील आदींच्या पथकाने संशयित आरोपीला मुंबई येथून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी तपास सहा.पोलिस निरीक्षक विशाल टकले व राकेश पाटील हे करीत आहेत.