चिमुरडीचे अपहरण; होमगार्डच्या जागरूकतेमुळे आरोपी जेरबंद

ऑक्टोबर 26, 2025 11:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील बसस्थानकावर भिक्षा मागणाऱ्या महिलेशी ओळख करुन तिच्या पाच वर्षांच्या मुलीला खाऊच्या नावाने अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला होमगार्ड पराग सपकाळे यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात पोलिसांना यश आले. बालिकेला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून यातील आरोपी यापूर्वीही बालिकेला पळवून विक्री केल्याच्या गुन्ह्यात तो दीड वर्ष कारागृहात होता. दीड महिन्यांपूर्वीच तो बाहेर आला होता. त्यातच पुन्हा बालिका पळवून नेताना अटक झाली.

New Project 1 3

बुधवार ( दि.22 ) रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान, भुसावळ बसस्थानकाजवळील रेल्वे क्षेत्र प्रशिक्षण केंद्रासमोर काजल मुन्ना ठाकूर (वय २९, रा. भाखा अमरपूर, जि. दिंडोरी, मध्यप्रदेश) यांच्या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच, शिरसाळे येथे मारुती दर्शनासाठी जात असलेल्या होमगार्ड पराग सपकाळे यांना बोदवड तालुक्यातील उजनी देवस्थान परिसरात एक व्यक्ती लहान मुलीसह संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. संशय आल्याने सपकाळे यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली.

होमगार्डकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने गोरेलाल भगवानसिंग कछवे उर्फ भिला (रा. अजदरा) याला उजनी देवस्थान येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अपहरण करण्यात आलेल्या बालिकेला सुखरूप सोडवण्यात आले आहे.

तपासात समोर आले की, आरोपीने फिर्यादी काजल ठाकूर यांच्याशी ओळख वाढवून जेवण वाटप करत असल्याचे सांगितले आणि त्याच बहाण्याने मुलीला आपल्या ताब्यात घेतले. आरोपीचा उद्देश बालिकेचा वापर भीक मागण्यासाठी करण्याचा होता. यापूर्वीही त्याच्यावर मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील चैनपूर पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा नोंद असल्याचे स्पष्ट झाले. होमगार्डच्या जागरूकतेमुळे आरोपीला पोलिसांनी जेरबंद करण्यात यश आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now