⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मंगला एक्स्प्रेसमधून महिलेची पर्स लांबविली, पण असा अडकला जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । रेल्वे गाड्यांमध्ये चोरी होणारे प्रमाण वाढले आहे. अशात डाऊन मंगला एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशाची पर्स लांबवणार्‍या नवापूर येथील भामट्या प्रवाशाला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी जाळ्यात
डाऊन ट्रेन क्रमांक 12617 मधून तक्रारदार रामवीर सिंह महादेव सिंह (32, मुरेना, मध्यप्रदेश) हे कोच क्रमांक एस- 4 मधील बर्थ क्र.68 वरून मुंबई ते मुरैना असा परीवारासह प्रवास करीत असताना चोरट्यांनी भुसावळ स्थानक येण्यापूर्वी सिंह यांच्या पत्नीची पर्स लांबवली. या पर्समध्ये दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल, दोन हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या पायल, 11 हजार 500 रुपयांची रोकडून मिळून 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल होता. या संदर्भात प्रवाशाने ईटारसी येथे तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे व आर.पी.एफ.चे पोलिस निरीक्षक राधाकृष्ण मीना यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल व भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर फलाट क्रमांक पाचवर एक संशयीत मंगला एक्सप्रेसमधून बॅग सह उतरताना दिसल्याने त्यांचा शोध घेतल्यानंतर भुसावळातील मुसाफीर खान्यातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

संशयीताने आपले नाव विक्रम मारेमुथू नायडू (24, रा.नवापूर, जि.नंदुरबार) सांगितले. संशयीताच्या झडतीनंतर त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल, दोन हजार रुपये किंमतीचे चांदीचे पायल तसेच दहा हजारांची रोकड, प्रवासी तिकीट, मतदान कार्ड आदी मुद्देमाल आढळल्याने तो जप्त करण्यात आला शिवाय संशयीताकडे पाचशे रुपये किंमतीचे एक जोड चांदीचे विचवे तसेच दोन हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल आढळल्याने त्या संदर्भात मुळ मालकाचा शोध घेणे सुरू आहे. तपास पोलीस नाईक सुनील बुधे हे करीत आहे.