जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गाडेगाव येथील सुप्रिम पाईप कंपनीजवळ घडली. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, अभिजित विनायक कोचूरे (वय-२२) रा. महाविर नगर, दुध फेडरेशन हा तरूण आई, वडिलांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, दुचाकीने ते पहूर येथून जळगावकडे येत असतांना गाडेगाव येथील सुप्रिम पाईप कंपनीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, काही वाहनधारकांनी तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.