जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही थांबताना दिसत नाहीय. गुरुवारी (१ ऑगस्ट) भरधाव डंपरने खासगी बसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाल्याची घटना ताजी असताना आणखी एका अपघाताची घटना समोर आलीय. भरधाव डंपरने ओमनी कारला जबर धडक दिली. या अपघातामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज दि २ ऑगस्ट रोजी सकाळी जळगाव तालुक्यातील सुनसगाव जवळ घडली.

काय आहे घटना?
बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी ओमनी वाहनाने आज शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी जळगाव येथे येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ओमनी कारमधील चार जण गंभीर तर एक जण किरकोळ जण जखमी झाले.नागरिकांनी त्यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेप्रकरणी, नशिराबाद पोलीस स्टेशनला शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत कुठलीही नोंद नव्हती.

अपघातातील जखमींचे नाव?
घटनेमध्ये विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष प्रभाकर बावस्कर (वय ५२), कारकून रामदास देवराम मोरे (वय ५०), सोसायटीचे सेल्समन प्रकाश निना सोनार (वय ४०) यांचेसह चालक कैलास पुंडलिक सुशीर (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना कैलास सुशीर (वय ३१) या तरुणाला किरकोळ मार लागला आहे.








