Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । चुलत बहिणीच्या साखरपुड्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या (राजस्थान) येथील २५ वर्षीय तरुणीचा पाचोरा रेल्वे स्थानकावर हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये घडली. दरम्यान, या घटनेची माहिती तिच्या कुटुंबाला कळवण्यात आली. युवतीचे आई-वडील पुण्याहून पाचोरा येथे दाखल झाले.
वाघिषा संजय पोतेदार (वय २५) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी कोटा येथील रहिवासी आहे. तसेच फरिदाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीस होती. ती २० रोजी सकाळी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वे स्थानकावरुन कर्नाटक संपर्कक्रांती एक्स्प्रेसने, पुणे येथे जाण्यासाठी निघाली होती. बुऱ्हाणपूर ते भुसावळ दरम्यान वाघिषाची प्रकृती अचानक बिघडली. एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर आल्यानंतर वाघिषाने औषधे घेतली. मात्र रेल्वे जळगाव ते पाचोरा स्थानकांदरम्यान असताना तिची प्रकृती अधिकच खालावली. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता गाडी पाचोरा स्थानकावर थांबवण्यात आली. वाघिषा हिला आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्राणज्योत मालवली.
तर कदाचित तिला वेळीच उपचार मिळाले असते!
बुऱ्हाणपूर ते भुसावळ स्थानकादरम्यान वाघिषाची प्रकृती अचानक बिघडली. भुसावळ रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस आल्यानंतर रेल्वेच्या डाॅक्टरांनी तिला औषधे देऊन पुढील प्रवासासाठी रवाना केले. त्याऐवजी तिला भुसावळात उतरवून डाॅक्टरांनी भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले असते, तर कदाचित तिला वेळीच उपचार मिळाले असते.