गुन्हेभुसावळ

दोन गावठी पिस्तुले अन् धारदार गुप्ती जप्त; शस्त्रांसह फिरणारा तरुण भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात..

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात अवैध शस्त्रे बाळगून दहशत पसरवणाऱ्यांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथील एका प्रसिद्ध वॉटर पार्कच्या मागील परिसरात दोन गावठी पिस्तुले (कट्टे) आणि एक धारदार गुप्ती बाळगून फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. भूषण शांताराम कोळी (वय १९, रा. पाडळसा, ता. यावल) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव असून या धडक कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

असा रचला सापळा

भुसावळ बाजारपेठ पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वॉटर पार्कच्या मागील मोकळ्या जागेत एक तरुण संशयास्पद हालचाली करत असून त्याच्याकडे धोकादायक शस्त्रे आहेत. माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण कोळी याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले (मॅगझीनसह), १३.५ इंच पाते असलेली गुप्ती आणि एक मोबाईल असा सुमारे ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित शस्त्रे बाळगण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे कशासाठी घेऊन आला होता? ही शस्त्रे त्याने कुठून मिळवली आणि त्याचा नेमका हेतू काय होता? याचा पुढील तपास भुसावळ पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे भुसावळ आणि यावल परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button