जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२५ । जळगाव शहरातील महाबळ कॉलनीतील १८ वर्षीय तरुण शुक्रवारी पहाटे घरातून निघून गेला आहे. जाताना त्याने पालकांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.त्यात मी घरातून जात आहे, मी मोठा होऊन परत येईल’ अशा आशयाचा मजकूर लिहून ठेवला आहे.याबाबत त्याच्या वडिलांनी तक्रार दिल्यावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली आहे.

विष्णुकांत सूरजमल तापडिया (रा. नीळकंठ हाइट्स, महाबळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा यश (वय १८ वर्ष, ५ महिने) हा शुक्रवारच्या पहाटे ५ वाजता घरातून निघून गेला आहे. त्याने त्याचा लॅपटॉप, मोबाइल, शैक्षणिक कागदपत्रे, कपडे, सँग आदी सामान सोबत घेऊन गेला आहे. यश याने घरातून जाताना पालकांसाठी हिंदी व मारवाडी भाषेत चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात मी घरातून जात आहे. मी व्यवस्थित राहील. माझा शोध घेऊ नका.

मी मोठी व्यक्ती होऊन घरी परत येईल, असा मजकूर लिहून ठेवला आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास रामानंदनगर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अजित पाटील हे करीत असून, त्यांनी या बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी त्याच्या मोबाइलचे सीडीआर रेकॉर्ड तपासण्यासाठी टाकले असल्याचे सांगितले.











