रात्री घराच्या गच्चीवर झोपायला गेला ; सकाळी आजी उठवायला गेली, पण नातवाला पाहून..

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२३ । जळगाव शहराला लागून असलेल्या खेडी खुर्द येथे एक दुर्दैवी घटना घडलीय. गच्चीला कठडे नसल्याने झोपेच्या धुंदीत शौचालयाला जात असतांना 25 वर्षीय तरुण छतावरून खाली पडल्याने जागीच ठार झाला. अंकुश ज्ञानेश्वर चौधरी (वय-25) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावात अंकुश चौधरी हा आई, वडील, भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. अंकुशचे वडील आजारी असतात. त्यामुळे अंकुश हाच शेतीचे सर्व कामे करतो, नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शेतीची कामे आटोपून अंकुश हा घरी आला, त्यानंतर जेवण करून घराच्या गच्चीवर झोपायला गेला.

बुधवारी सकाळी सहा वाजेला अंकुशची आजी गोपाबाई विठ्ठल चौधरी गच्चीवर झोपलेल्या नातू अंकुश याला उठविण्यासाठी गेल्या. यादरम्यान गच्चीच्या खाली रक्ताबंबाळ अवस्थेत अंकुश हा पडलेला दिसून आला. नातवाचा मृतदेह पाहून आजीने आरडाओरड करत हंबरडा फोडला.

अंकुश हा गच्चीवर झोपला होता, मध्यरात्री शौचालयास जाण्यासाठी उठला असता, झोपेच्या धुंदीत कठडे नसल्याने गच्चीवर तो खाली पडला व त्याचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

दरम्यान, वडील आजारी, तसेच कुटुंबांची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्त्या मुलाचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्‍त केली जात आहे