जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२४ । गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या ११ वर्षीय मुलाला एका महिला पोलिसाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नदी उडी घेत त्या मुलाचे प्राण वाचवले. ही घटना जळगाव तालुक्यातील कानळदा येथे घडलीय.
याबाबत असे की, कानळदा येथील गिरणा नदीच्या तीरावर असलेल्या महर्षी कणवाश्रमात ऋषिपंचमी निमित्त दरवर्षी महिला भाविकांची हजारोच्या संख्येने गर्दी असते. महिला भाविक नदीमध्ये आंघोळ करून महर्षी कण्वऋषींच्या गुफेमध्ये पूजा करतात. याच दरम्यान, नैतिक सुभाष गायकवाड या 11 वर्षीय मुलगा गिरणा नदीपात्रात पूजेचे पैसे उचलण्यासाठी गेला असताना. मात्र तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि तो काठावरून खाली पाण्यात पडला.
ते पाहून एकच गोंधळ झाला. मात्र त्याला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. तेथेच ड्युटीवर तैनात असलेल्या कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांनी ही घटना पाहिली. वर्दीवर असतानाही त्यांनी काहीही विचार न करता, जीवाची पर्वा न करता क्षणार्धात गिरणेत उडी घेऊन त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले.
या महिला कर्मचाऱ्याच्या धाडसाचे उपस्थित महिला भाविक, महर्षी कणवाश्रमाचे विश्वस्त तसेच सरपंच व सदस्यांमार्फत परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.