जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२४ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २५ ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे पोलिसांकडून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जागोजागी कडक बंदोबस्त केला जाणार. मात्र त्यापूर्वीच जळगाव विमानतळावरून एक मोठी बातमी समोर आली. खरतर जळगाव विमानतळावर घुसलेल्या तीन अतिरेक्यांनी विमान प्रवाशांना ओलिस ठेवल्याचा निरोप तेथील सुरक्षा यंत्रणेने कंट्रोलला कळवला. यानंतर कार्यवाहीत शीघ्रकृती दलाच्या जवानांनी एका अतिरेक्याचा खात्मा केला तर दोघांना जेरबंद करून तिघा प्रवाशांची सुटका केली.मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त हे मॉकड्रील अतिरेकी विरोधी पथकाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले
बुधवारच्या सकाळी पोलिस कंट्रोल रूमवरून शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक पथकासह सर्व प्रमुख विभाग, पोलिस ठाण्यांना अति तातडीचा निरोप कळवण्यात आला. यात अतिरेक्यांनी विमानतळावर काही प्रवाशांना ओलिस धरले आहे. त्यानंतर शहरातील सहाही पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलिस दल, गुप्त वार्ता विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, बॉम्ब शोध पथक आदींसह पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित आदींची वाहने विमानतळाच्या परिसरात दाखल झाली. परिस्थितीची माहिती जाणून घेत विविध विभागांना सूचना दिल्या.
सुरुवातीला अतिरेक्यांकडून सुरक्षा यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार केल्याने नेमके किती अतिरेकी आहे. याचा अंदाज येत नव्हता. अर्धा तासाने शीघ्र कृती दलाच्या जवानांनी एका अतिरेक्याचा खात्मा करण्यात यश मिळवले. ती आघाडी कायम राखत जवानांनी आणखी दोन अतिरेक्यांनाही जेरबंद केले. त्यासोबतच अतिरेक्यांनी ओलिस ठेवलेल्या तिघा प्रवाशांची सुटका केली. या मॉकड्रीलचे आयोजन एटीएसचे प्रभारी पीएसआय अमोल काळे, पीएसआय प्रदीप बडगुजर, बी. के. पाटील यांनी केले. या वेळी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.