अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार ; शिक्षकाला सुनावली मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा

मे 12, 2023 12:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी खासगी क्लासच्या शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप आणि सव्वा लाख दंडाची शिक्षा सुनावली. तुषार शांताराम माळी (३३, रा. नशिराबाद परिसर) आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

court crime jpg webp

नेमकी काय आहे घटना?
आरोपी तुषार माळी याचा नशिराबाद परिसरामध्ये श्रीसमर्थ नावाचा शैक्षणिक क्लास होता. तुषार माळी याने अल्पवयीन विद्यार्थिनीची इच्छा नसताना तिच्या आई-वडिलांना भेटून “तुमच्या मुलीला शिष्यवृत्तीचा क्लास माझ्याकडे लावा, मी तुमच्या कडून फीचे पैसे घेणार नाही”, असं सांगितले. ऑगस्ट २०१७ पासून विद्यार्थिनी क्लासला जायला लागली. माळी हा विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीच्या बॅचच्या एक तास अगोदर क्लासमध्ये बोलवून चॉकलेट खाण्यास द्यायचा. त्यानंतर घरामध्ये नेऊन अत्याचार करत होता. त्याने डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीमध्ये वारंवार अत्याचार केले.

पीडित विद्यार्थी शिक्षकाला विरोध करायची. मात्र, शिक्षकाने तिला दोघांचे फोटो लोकांना दाखवून बदनामी करेल, अशी धमकी दिल्यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनीने कुणालाही काहीही सांगितले नाही. मात्र, मार्च २०१८ मध्ये विद्यार्थिनीचे पोट दुखत असल्यामुळे तिला तिच्या आईने जळगावातील रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेळी विद्यार्थिनी ही गर्भवती असल्याची बाब समोर आल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर १७ मार्च २०१८ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात तुषार माळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित विद्यार्थिनी, वैद्यकीय अधिकारी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यासमोर आलेल्या संपूर्ण पुराव्याअंती तुषार माळी याला दोषी धरून गुरूवारी मरेपर्यंत जन्मठेप आणि सव्वा लाख दंडाची शिक्षा सुनावली.

दंडाच्या संपूर्ण रक्कमेतून ५० टक्के रक्कम ही पीडित विद्यार्थिनीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणामध्ये पीडित विद्यार्थिनीला बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण नियम २०१२ मधील कायदा ७ नुसार महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रूपये रक्कम पुर्नवसनासाठी देण्याचे आदेश देखील जिल्हा न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. तर तपास अधिकारी म्हणून आर.एन.खरात यांनी तर पैरवी नरेंद्र मोरे, विजय पाटील, गुणवंत सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now