देशासाठी दिला जळगाव जिल्हातील जवानाने प्राण : अनंतात विलीन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथील सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला आसाम येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. प्रदीप नाना पाटील (वय ४०) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे.

आसाम येथे परेड सुरू असताना प्रदीप पाटील यांच्या छातीत अचानक दुखायला लागले होते. यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन ते तीन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

उपचार सुरू असताना १३ मार्चला प्रदीप पाटील यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप यांचा मुलगा सहावीच्या वर्गात आहे. तर मुलगी ही चौथीत शिकते. गुरुवारी प्रदीप पाटील यांचे पार्थीव चाळीसगावात दाखल झाले. फुलांनी सजवलेल्या सैन्य दलाच्या वाहनात शहीद प्रदीप पाटील यांचे पार्थिव कोदगाव येथे नेण्यात आले. चाळीसगाव शहरातून त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. १२ वर्षांच्या चिमुरड्याने आपल्या पित्याला अग्निडाग दिला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.